पोलिसांच्या कुशल तांत्रिक तपासामुळे वृद्ध दाम्पत्याचे दागिने परत

वसई : मुलाच्या लग्नात मिळालेला आहेर आणि सोन्याचे दागिने रिक्षात विसरल्याने हवालदिल झालेल्या एका पित्याच्या मदतीला वाहतूक पोलीस ‘देवदूत’ बनून आले. केवळ ४ आकडे आणि नंतर ई-चलानच्या आधारे पोलिसांनी या रिक्षाचालकाचा शोध घेऊन मूळ मालकाला दागिने परत मिळवून दिले.

नायगाव येथे राहणाऱ्या मधुकर येरम (६३) यांच्या मुलाचे १६ नोव्हेंबर रोजी काशिमीरा येथे लग्न झाले होते. लग्नात मिळालेली आहेराची पाकिटे आणि दागिने असलेली बॅग घेऊन ते पत्नीसह काशिमीरा येथून निघाले. मात्र पत्नीला गाडीचा त्रास झाल्याने त्यांनी रिक्षा केली आणि महामार्गानेच नायगावला येण्यासाठी निघाले.

घरात आल्यावर दागिने आणि आहेराचे पैसे असलेली बॅग रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. येरम यांना रिक्षाचा क्रमांकही माहीत नव्हता. या घटनेने मुलाच्या लग्नाचा आनंद तर विरला, पण कुटुंबाला काय तोंड दाखवू असा प्रश्न पडला. त्या बॅगेत आहेराचे ५० हजार रुपये, लाखो रुपये किमतीचे सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यांच्या एका क्षुल्लक चुकीने होत्याचे नव्हते झाले होते. मात्र तरी त्यांनी वालीव पोलिसांची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली. वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सचिन दोरकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला.

ज्या मार्गावरून येरम रिक्षाने घरी आले, त्या मार्गावरील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात त्यांना ती रिक्षा दिसली. मात्र त्यावर फक्त ३०४९ असे ४ आकडे दिसत होते आणि एक स्टीकर दिसले. ते स्टीकर देखील स्पष्ट नव्हते. केवळ ४ आकडय़ांवरून शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. महामार्गावर मुंबई आणि ठाणे पासिंगच्या रिक्षा चालतात. ती शक्यता लक्षात घेऊन त्यांनी रिक्षा चालकांची तपासणी केली. विविध रिक्षा युनियनच्या नेत्यांशी संपर्क साधला. ज्या नावाचे स्टीकर होते त्या सर्व रिक्षाचालकांकडे चौकशी करायला सुरुवात केली. मात्र तरी यश मिळत नव्हते. शेवटी ई-चलान यंत्रणा कामाला आली.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना ई-चलान आकारला जाते. त्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक दादाराव कारंडे यांनी काढायचे ठरवले.

हा शेवटचा प्रयत्न होता. त्या चार आकडय़ांवरून अखेर त्यांना रिक्षा सापडली. ही रिक्षा रामकैलास यादव याच्या मालकीची होती. त्याने देखील दागिने शोधण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले. आपला गेलेला मौल्यवान ऐवज तीन दिवसांनी परत मिळाल्याने येरम यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पोलिसांच्या तत्पतेने ही बॅग शोधण्यास मदत झाली. वाहतूक पोलीस माझ्यासाठी देवदूत ठरले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.