८० टक्के घटनांत मौजमजेसाठी दुचाकी पळविल्याचे उघड

वसई:  वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरात दुचाकी चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. यातील ८० टक्के दुचाकी या जॉय रायडर्स अर्थात मौजमजेसाठी चोरून रस्त्यावर टाकून दिली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा दुचाकी चोरण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून चार दिवसांत तब्बल २८३ बेवारस मोटारसायकली शोधण्यात यश आले आहे. यापैकी ८ वाहने ही चोरी करून रस्त्यात सोडून देण्यात आलेली होती.

 वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरात १५ पोलीस ठाणी असून  मागील वर्षभरात ५०० हून अधिक चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत. यापैकी बहुतांश दुचाकी या तरुणांकडून मौजमजेसाठी चोरल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नशापाणी करणारे तरुण रस्त्यात उभ्या केलेल्या दुचाकींचे लॉक तोडून त्या चोरतात. पेट्रोल असेपर्यंत त्या वापरतात आणि नंतर रस्त्यात टाकून देतात. या दुचाकींचा गुन्ह्यंसाठी देखील वापर होत असल्याचे अनेक प्रकरणात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस मोटारसायकली शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.

पोलीस आयुक्तालयात ३ परिमंडळे असून तीनही परिमंडळाच्या उपायुक्तांच्या अखत्यारीत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. बेवारस दुचाकी शोधून त्यांच्या मालकांचा शोध लावला जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ महेश पाटील यांनी दिली.  पहिल्या ४ दिवसात पोलिसांनी २८३ बेवारस दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यापैकी ८  चोरीच्या असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

रस्त्यावर दुचाकी उभी करणे धोकादायक

नशापाणी करणारे रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी चोरत असतात. वाहनांना हॅंडल लॉक केलेले असते. ते सहज उघडता येते असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अनोळखी ठिकाणी वाहने उभे करणे टाळावे, असे आवाहन माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी केले आहे.

चोरलेल्या दुचाकींपैकी ८० टक्के  या नशेबाजांनी मौजमजेसाठी चोरलेल्या असतात. या विशेष मोहिमेत रस्त्यावरील बेवारस दुचाकी शोधून  चोरीच्या दुचाकींचा छडा लावला जाणार आहे

-डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय