scorecardresearch

एकाच घराची अनेकांना विक्री

वसई-विरार शहरात चाळ माफिया मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत चाळी उभारत असून त्यातील घरे विकण्यासाठी नोटरीचा आधार घेत आहेत.

वसई, विरारमध्ये सर्वसामान्यांची फसवणूक होण्यात वाढ

सुहास बिऱ्हाडे

वसई : वसई-विरार शहरात चाळ माफिया मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत चाळी उभारत असून त्यातील घरे विकण्यासाठी नोटरीचा आधार घेत आहेत. केवळ नोटरीवर व्यवहार करून एकच घर अनेक जणांना विकण्याचे प्रकारही सुरू आहेत.  यात शहरात बेकायदा नोटरी वकीलदेखील सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी नोटरी वकिलांना अनधिकृत घर खरेदी विक्रीचे व्यवहार न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वसईच्या पूर्व भागात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. नालासोपारा, विरार आणि वसईच्या पूर्वेला शासकीय जमिनी, आरक्षित जमिनी तसेच मालकी खासगी जमिनींवर भूमाफिया आणि चाळमाफियांकडून दररोज अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. बेकायदा चाळी बांधून त्या स्वस्तात विकल्या जात आहेत. अनधिकृत चाळींची दुय्यम निबंधकांकडे अधिकृत नोंदणी होणे शक्य नसते. त्यामुळे या अनधिकृत घरांचा व्यवहार अधिकृत आहे असे भासविण्यासाठी नोटरीचा आधार घेतला जातो. चाळ माफिया पैसे दिल्याचा व्यवहार नोटरीकडे करून घराचा व्यवहार झाल्याचे लोकांना भासवितात. लोक भुलून आर्थिक व्यवहार करत असतात. प्रत्यक्षात त्यांना अनधिकृत घर मिळते आणि अनेकदा एकच घर ४ ते ५ जणांना विकले जात असल्याने ते अनधिकृत घरही नागरिकांना मिळत नाही.  केवळ नोटरीच्या आधारे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे आम्ही नोटरी करणाऱ्या सर्व वकिलांची बैठक घेऊन अनधिकृत घरांची नोटरी करू नये, अशा सूचना दिल्याचे तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.

शहरात बेकायदा नोटरी करणारे वकील

  • वसईत राज्य शासनाने नियुक्त केलेले १४ नोटरी असून केंद्र शासनाने नियुक्त केलेले २५ नोटरी आहे. प्रत्येक नोटरी करणाऱ्या वकिलांना त्यांचे क्षेत्र ठरवून दिलेले असते. परंतु वसईत बाहेरचे अनेक नोटरी वकील येऊन असे व्यवहार करत असतात, असा आरोप वसई तालुका नोटरी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश खोब्रागडे यांनी केला आहे. नोटरी करताना प्रत्यक्ष दोन्ही पक्षकार समोर असणे गरजेचे आहे तसेच करारपत्रावर स्वाक्षरी करताना ते तपासणे गरजेचे असते. मात्र नियमांचे उल्लंघन होत आहे. वसई-विरार शहरात एक नोटरी वकीलांचे ५-६ ठिकाणी कार्यालये असतात आणि त्यांचे सहकारी नोटरीच्या वतीने दस्तावेज पुर्ण करून सह्य करतात असा आरोप त्यांनी केला.
  • चाळीत घरे घेणारे परराज्यातील तसेच श्रमिक वर्गातील असतात. घरांच्या व्यवहारात नोंदणीकृत दस्तावेज आणि नोटरी यातील फरक कळत नाही. त्यामुळे त्यांची फसगत होते, असेही यांनी सांगितले.

घराची नोंदणी  दुय्यम निबंधकांकडे मुद्रांक शुल्क भरून करायची असते.  नोटरी केलेल्या व्यवहाराने  अधिकृत नोंदणी नसते. यामुळे शासनांचे मुद्रांक शुल्काच्या रुपयांतील महसूल बुडतो.

-रोहन खाडय़े, विधी सल्लागार, मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय

चाळ माफिया अनधिकृत घरे बनवून नोटरीच्या आधारे नागरिकांची फसवणूक करतात. त्यामुळे अशा अनधिकृत घरांची नोटरी करू नये, अशा सूचना शहरातील नोटरी वकिलांना देण्यात आल्या आहेत.

-राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Selling people fake house land ysh

ताज्या बातम्या