भाईंदर :पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत कांदा, लसूण, मुळा, बीटरूट यांसारखे कंदमूळ पदार्थ न आणण्याचे आवाहन करणाऱ्या सेव्हन इलेव्हन शाळेची आता शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकरणी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून दोन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मिरा रोड येथे आमदार नरेंद्र मेहता यांची सेवेन इलेव्हन शाळा आहे.पर्युषण पर्वाच्या काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात विशिष्ट खाद्यपदार्थ न आणण्याबाबत शाळेने पालकांना संदेश पाठविला होता.यामुळे राज्यातले वातावरण पेटून उठले होते.त्यामुळे शाळेकडून हा संदेश मागे घेण्यात आला.दरम्यान यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागानेही वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांकडे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी ११ सप्टेंबर रोजी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर धार्मिक कारणांवरून निर्बंध लादणे, तसेच त्यांच्यावर मानसिक दबाव आणणे हे बालकांच्या हक्कांशी संबंधित तरतुदींशी विसंगत असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.शाळेने दोन दिवसांत या प्रकरणाचा लेखी खुलासा सादर करावा, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास शालेय संहिता आणि बालकांच्या हक्कांनुसार कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.