विरार : वसई पूर्वेला मार्च महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील अमृत योजनेचे काम रखडल्याने या भागात अजूनही पालिकेचे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे उन्हाळा सुरू होतो न होतो तोच येथे पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. ही पाणीसमस्या मिटेपर्यंत पालिकेने टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
वसईच्या पूर्व भागात मोठय़ा प्रमाणात औद्योगिक वसाहती आणि नागरीकरण होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. परंतु पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा असल्याने अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यात शासनाच्या अमृत योजनेचे काम रखडत सुरू आहे.
प्रभाग समिती जी मधील जुचंद्र-नायगाव पुर्व, वालीव, सातिवली, गोखीवरे, कामण या विभागांमध्ये अत्यंत अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. येणारे पाणी चार ते पाच दिवसाआड येत असून ते मिळवण्यासाठी अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही चाळीवस्त्यांसह, आदिवासी पाडय़ांमधे महानगरपालिकेचे पाणी पोहोचलेलेच नाही. येथे पाणीटंचाई होऊन नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यातच पाणीमाफियांनी पाण्याच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने नागरिकांचे जणू कंबरडेच मोडले आहे. टँकरद्वारे पाणी मागवणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. औद्योगिक वसाहतींनासुद्धा आता पाणीटंचाईचा त्रास होत आहे. अनेक कारखान्यांत पाण्याअभावी काम बंद ठेवावे लागत आहे. कारखानदारही आता अडचणीत आले आहे.
पालिकेकडून अजूनही वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्याचे संकेत मिळत नाहीत. नागरिकांना पाणीटंचाईपासून तात्पुरता दिलासा देण्यासाठी जूचंद्र-नायगाव पूर्व, वालीव, सातिवली, गोखीवरे, कामण या विभागांमध्ये आवश्यकतेनुसार नवीन बोअरवेल मारून त्याव्दारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच तीव्र पाणीटंचाईच्या भागात टँकरव्दारे दैनंदिन पाणीपुरवठा करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
