scorecardresearch

विरारमधील एकमेव सांडपाणी प्रकल्पात बिघाड ; सांडपाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त

वसई-विरार महानगरपालिकेचा विरार येथे एकमेव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आहे.

विरारमधील एकमेव सांडपाणी प्रकल्पात बिघाड ; सांडपाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त
(संग्रहित छायाचित्र)

विरार : वसई-विरार महापालिकेने ६५ कोटी रुपये खर्चून उभारलेला विरारच्या बोळींज येथील सांडपाणी प्रकल्प अवघ्या ५ वर्षांत बिघाड झाला आहे. प्रकल्पातील सांडपाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांना घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातली सांडपाणी प्रकल्पात नेणाऱ्या मलवाहिन्या चोकअप झाल्यामुळे सांडपाणी या प्रकल्पापर्यंत जात नसल्याचेही उघड झाले आहे.

वसई-विरार महानगरपालिकेचा विरार येथे एकमेव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आहे. या प्रकल्पातून दररोज ३० दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. विरार शहरातील गृहसंकुलांमधील सांडपाणी विविध व्यासाच्या भुयारी गटारामार्फत या केंद्रावर पोहचविले जाते.

ही गटारे साफ करता यावी यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी झाकणे (चेंबर्स) बसविण्यात आले आहेत. पण  या वाहिन्यांची नियमित साफसफाई न झाल्याने अनेक ठिकाणच्या वाहिन्या चोकअप झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या दाबाने या वाहिन्या दबल्या गेल्या आहेत. तर काही ठिकाणी या वाहिन्या खराब होऊन त्यांना गळती लागली आहे. यामुळे दररोज निर्माण होणारे सांडपाणी प्रकल्प केद्रांपर्यंत पोहचण्यास अडचणी निर्माण होत आहे.

त्यामुळे या प्रकल्पातून केवळ २० दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. चोकअप झालेल्या आणि गळक्या वाहिन्यांमुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

यामुळे या वाहिन्या तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता असतानाही पालिकेने अजूनही या कामाला सुरुवात केली नाही. यामुळे नागरिकांना घाणीचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. 

सांडपाणी प्रकल्पाची दुरुस्ती करणार

सांडपाणी प्रकल्प नादुरुस्त असल्याबाबत महापालिकेला विचारले असता पाणीपुरवठा विभागाने माहिती दिली की, पालिकेने या प्रकल्पाच्या मलवाहिन्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली  आहे. यासाठी १ कोटी २६ लाख ९९ हजार ६८० रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच या निविदा प्रक्रिया राबविल्या जाऊन कामाला सुरुवात केली जाईल. यात मलवाहिन्या दुरुस्ती तसेच चेंबर बदलण्याच्या कामांचा समावेश आहे.

अवघ्या ५ वर्षांत प्रकल्पाला घरघर?

शहराला सध्या प्रतिदिन २३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. गळती वजा जाता १९६.३५ दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन उपलब्ध होते. त्यातील १५६.२८ दशलक्ष लिटर एवढे सांडपाणी निर्माण होत असते. शहरातील पहिला सांडपाणी प्रकल्प विरारच्या बोळींज येथे तयार करण्यात आला होता. २०१७ मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले होते. या प्रकल्पासाठी ६६ कोटी रुपयांचा खर्च आला होता.  प्रकल्पाचे काम निकृष्ट असल्याने तो वारंवार बंद पडत असतो, असा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. शहरातील सांडपाण्यावर पुनर्पक्रिया न होता ते थेट समुद्र आणि खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर जलप्रदूषण होत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेला अपयश आल्याने हरित लवादाने पालिकेला १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडाची रक्कम आता दीडशे कोटींवर गेली आहे. पालिकेने शहरात एकूण ७ सांडपाणी प्रकल्प प्रस्तावित केले होते. हरित लवादाच्या दंडामुळे पालिकेचे प्रकल्प सुरू करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. नालासोपारा येथील प्रकल्प क्रमांक २ आणि ३ साडेचारशे कोटींचा असून तो निधी अभावी रखडला आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sewage plant at bolinj in virar breakdown in just 5 years zws

ताज्या बातम्या