पुराणकाळात किंवा दंतकथेत शैतान, दैत्य, राक्षस आदींच्या कथा असायच्या. त्या कथा मुलांना ऐकवल्या जायच्या. कुठूनतरी दूर डोंगराच्या आडून राक्षस, शैतान येतो अशी भीती मुलांना घातली जायची.. या दंतकथा असल्या तरी आजही असे राक्षस मुलांच्या आसपास वावरत आहेत. ते घरातील नोकर, चालक, शिक्षक, सुरक्षारक्षक, कुटुंबातील वडीलधारे आदींच्या रुपात असतात. संधी मिळताच त्यांच्यातील राक्षस जागा होत असतो.. अशा आसपासच्या शैतानांपासून चिमुकल्यांना वाचविण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे.

बदलापूर येथील आर्दश विद्यामंदीर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचार्‍याकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराने राज्य ढवळून निघाले. प्रत्येक पालकांच्या मनातील संताप व्यक्त होऊ लागला. या घटनेनंतर दररोज अशा चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांच्या बातम्या प्रकर्षाने येऊ लागल्या. हा प्रकार नवीन नव्हता. चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार सतत होत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर त्यांना ठळक प्रसिध्दी मिळू लागली एवढंच. या गदारोळात प्रश्न पडतो तो आपली चिमुकली मुले सुरक्षित आहेत का? मुलांना विश्वासाने शाळेत, शिकवणी वर्गात पाठवले जाते. इमारतीचा सुरक्षारक्षक, घरातील नोकर, बसचालक आदींकडे विश्वासाने मुले सोपवली जातात. पण त्यांच्यापासूनच मुलांना धोका असतो, हे या अत्याचारांच्या विविध घटनांमधून दिसून येत आहे. कारण आसपास वावरणार्‍या या लोकांमध्येच एक राक्षक, हैवान दडलेला असतो.

आणखी वाचा-विरारमध्ये पत्नीची हत्या, पतीला अटक

हे प्रकार वेळीच रोखता येतात. पण तसे होत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. वसई विरार मधील गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना प्रतिनिधिक आहेत. नालासोपारा मधील अवधेश विकास यादव या इंग्रजी शाळेत घडलेली घटना अशीच बोलकी ठरवी. ९ वीत शिकणार्‍या १४ वर्षीय मुलीवर शाळेतील शिक्षक अमित दुबे सतत ५ महिने बलात्कार करत होता. त्याने मुलीला फुस लावून जाळ्यात ओढलं आणि तिचे लैंगिक शोषण सुरू केले.

या मुलीला एकदा चक्कर येऊन ती बेशुध्द पडल्याने हा प्रकार उघडकीस आला. पण हे अचानक घडलं नव्हतं. एक वर्षापूर्वी याची सुरवात झाली होती. मुलीला चाचपडण्यासाठी २०२३ मध्ये त्याने मुलीच्या पोटावरून एकदा हात फिरवला. मुलीने प्रकार घरी सांगितला. तिचे पालक शाळेत आले. मात्र शाळेचा मुख्याध्यापक विकास यादव आणि पर्यवेक्षकाने मुलीच्या पालकांनाच दमात घेतलं. विकास यादवने तर मुलीच्या भावाच्या कानशिलात मारली. ते प्रकऱण शाळेने मिटवलं. पालकही शांत बसले. या प्रकारामुळे अमित दुबे याची हिंमत वाढली. त्याने मुलीशी अधिक जवळीक वाढवली आणि एका बेसावध क्षणी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर सतत धमकावत तो तिच्यावर सतत ५ महिने बलात्कार करत होता. जर वेळीच कारवाई झाली असती तर हा प्रकार घडला नसता. या घटनेनंतर शाळेबाहेर पालकांनी आंदोलन केले. पालक आणि राजकीय पक्षांच्या दबावानंतर मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले.

आणखी वाचा-पालिकेच्या व्हीआयपींच्या यादीत राजकारण्यांचा भरणा; शहरातील मान्यवर नागरिकांना वगळले

खासगी शिकवण्या धोकादायक

लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा घटना या खासगी शिकवणी वर्गात (कोचिंग क्लासेस) मध्ये, नृत्याच्या, क्रिडा प्रकारांच्या वर्गात घडत असतात. मुळात खासगी शिकवणी कुणी घ्यावी याला नियमावली नसते. असे शिक्षक तरुण असतात. त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण नसते. विरारच्या मनवेलपाडा येथे ईंशात कोचीग क्लासेस चालवणारा प्रमोद मौर्या हा मुलींचा लैंगिक छळ करत होता. बदलापूर घटनेनंतर पालकही जागृत झाले होते. मुलगी क्लासला का जात नाही याची विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला. मग नागरिकांनी या मौर्याला चोप देत त्याची धींड काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. २०२३ मध्ये पोलीस अकदामी चालवणारा सदानंद गावडे हा पोलीस क्लासमध्ये येणार्‍या मुलींचा लैंगिक छळ करत असल्याचे प्रकऱण समोर आले होते. पीडित मुलींनी सांगितलेले अनुभव अंगावर शहारे आणणारे होते. समाधान गावडे हा स्वत: वसई रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होता. विविध खासगी शिकवणी क्लासेस, नृत्य, व्यायामशाळा, क्रिडाप्रकारांचे क्लासेस या मध्ये जाणार्‍या मुलांचे लैंगिक शोषण होत असते. त्यांच्या तक्रारीही फारशा होत नाहीत. १८ वर्षाखालील मुली अजाण असतात. मात्र त्यांच्या या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना फूस लावून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असते. त्यामुळेच पोक्सो कायदा तयार करण्यात आला आहे.

अशा खासगी शिकवणी वर्गांवर सरसकट आरोप करणे जड असेल किंवा चुकीचे असले तरी या ठिकाणी लैंगिक अत्याचारांच्या असंख्य घटना घडत असतात ते नाकारून चालणार नाही. शाळांमध्ये गुड टच बॅड टच वगैरे प्रकार शिकवले जातात. पण शिक्षकांकडूनच लैंगिक अत्याचाराचे प्रकार होत असतात. जाणीव सारख्या संस्था शाळेत जाऊन मुलींचे प्रबोधन करून त्यांना या संभाव्य धोक्यांबाबत जागरूक करत असतात. या संस्थेकडे मुलींचे येणारे अनुभव धक्कादायक आहे. घरातील काका, मामा, चुलत भाऊ, आईचा मित्र, लांबचा नातेवाईक यांच्याकडून लैंगिक अत्याचार होत असतात.

आणखी वाचा-मालमत्ता थकबाकीदारांना पालिकेचा दणका; पालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरवात

अवतीभोवती असणाऱ्या या ‘राक्षसां’मुळे पालकांनी आता अधिक सजग यायला हवे

आपली मुले कुठे जातात? कुणाशी बोलतात? यावर लक्ष ठेवायला हवे. मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवता कामा नये. काळ बदलला आहे. लोकांमधील विकृती वाढत आहे. सभ्यपणाचा मुखवटा घालून आत मधला राक्षस दडवला जातोय. अशा राक्षसांपासून आपल्या मुलांना वाचवायला हवं.

तक्रार पेट्यांचे काय झाले?

बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिसांनी देखील शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. शाळांमध्ये काम करणार्‍यांसाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. ही चांगली गोष्ट असली तरी यात सातत्य हवे आणि या उपाययोजनांची अमंलबजावणी व्हायला हवी. शाळा, महाविद्यालयाती विद्यार्थीनिंना निर्भयपणे आपल्या तक्रारी मांडता याव्या यासाठी शाळा, महाविद्यालयांबाहेर तक्रार पेट्या लावण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्याची देखील अंमलबजावणी झालेली नाही. या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी.