भाईंदर : महाराष्ट्रातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी भाईंदर येथील श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्टने मुख्यमंत्री सहायता निधीस ७ लाख १०१ रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट तसेच ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देत या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच संस्थेच्या वतीनेही आर्थिक योगदान देण्यात आले. यासाठी १ ऑक्टोबर रोजी बँक ऑफ इंडिया, भाईंदर शाखेचा २९८१६१ क्रमांकाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला.या मदतीमध्ये श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट, शंकर नारायण कला व वाणिज्य महाविद्यालय, प्रविण रोहिदास पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि रोहिदास पाटील व्यवस्थापन महाविद्यालयाचा सहभाग आहे.नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत शासनाच्या मदत व पुनर्वसन कार्याला भविष्यातही शक्य ते सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रोहिदास शं. पाटील यांनी दिली.
