वसई:- विरार पूर्वेच्या भागातून गेलेल्या शिरसाड अंबाडी रस्त्यावर हायवा ट्रकच्या धडकेत ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक माल हायवा ट्रक मध्ये भरून त्याची वाहतूक केली जात आहेत. याशिवाय ही वाहने बेदरकारपणे चालविली जात असल्याने अपघाताच्या घटना समोर येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शिरसाड- वज्रेश्वरी मार्गावर शिरसाड नाक्याजवळ शुक्रवारी झालेल्या हायवा ट्रक व दुचाकी अपघातात पारोळ गावातील उद्योजक रविंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सातत्याने भीषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने नुकताच चांदीप येथील बा.बा.जाधव स्मारक विद्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत परिसरातील ग्रामस्थ व सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत शिरसाड – वज्रेश्वरी मार्गावर हायवा ट्रकमधून होणारी ओव्हरलोड वाहतुक, ट्रकमध्ये क्लीनर नसणे, रस्त्याचे काँक्रीटीकरण कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक व्यवस्था, झाडे कटिंग, स्पीड ब्रेकर, परिसरातील वीज व्यवस्था, अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः हायवा ट्रक हे कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नसल्याने अशा अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी ही नागरिकांनी या बैठकीत केली.
पर्यायी रस्त्याची आवश्यकता
शिरसाड वज्रेश्वरी रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे, या वाहतूकीमुळे रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. पर्यायी मार्ग म्हणून मुंबई बडोदा या नव्या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे, येथील लोकप्रतिनिधी यांना सांगून शिरसाड ते अकलोली- वज्रेश्वरी असा मार्ग वाहतुकीस सुरू केल्यास शिरसाड- वज्रेश्वरी मार्गावरील ५० टक्के वाहने कमी होतील असे मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्यामुळे रस्त्याचे काम ही लवकर पूर्ण होईल. तसेच क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणारी वाहने आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू केली असल्याचे ही पोलिसांनी सांगितले आहे.
समिती स्थापन करणार
शिरसाड – खानिवडे, चांदीप, पारोळ,भाताने या पंचक्रोशीतील प्रत्येक गावातील सर्व पक्षीय नागरिकांना घेऊन एक समिती स्थापन करण्यात येणार आहे, या समितीमार्फत परिवहन विभाग, वन विभाग, रस्ते विकास मंडळ, पर्यावरण विभाग, वीज मंडळ खाते अशा अनेक संबंधित खात्यांना पत्रव्यवहार करून ग्रामीण भागातील समस्या सोडविल्या जातील असे सांगून, कामात दिरंगाई व हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी विरोधात आवाज उठवून उग्र आंदोलनही केलं जाईल असा इशारा पहिल्याच बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
