वसई: वसई-विरार महापालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पुन्हा एकदा नव्याने पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय झाली आहे. पालघर जिल्ह्याची संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेले शिवसेना नेते व राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवारी वसई-विरारचा दौरा केला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वसई विरारमध्ये जनता दरबार आयोजित केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत संवाद साधताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, माझ्याकडे ज्या ज्या खात्यांची जबाबदारी आहे, त्या संबंधित नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे जे काही प्रश्न प्रलंबित असतील, ते सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. यासाठी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या थेट आणि तातडीने मार्गी लावल्या जातील.
आगामी निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने उतरण्याचे आवाहन
कोकणचा विकास असो वा स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका; आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने आणि अभ्यासू वृत्तीने मैदानात उतरावे, असे आवाहन कदम यांनी यावेळी केले. या दौऱ्यादरम्यान आयोजित बैठकीस शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेंद्र गावित, संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील, जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, नगरसेविका व गटनेत्या हेमलता सिंह, जिल्हा सचिव अतुल पाटील, तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेना भाजपची युती अभेद्यच
राज्यात महायुतीमधील काही नेत्यांकडून उपस्थित होत असलेल्या नाराजीच्या आणि आरोपांच्या मुद्द्यावर बोलताना कदम म्हणाले की, कुटुंब म्हटल्यानंतर लहान-सहान वाद होतच असतात, मात्र याचा अर्थ आमचे संबंध बिघडले असा होत नाही. शिवसेना आणि भाजपाची युती अभेद्य आहे. जर काही मतभेद किंवा विषय असतील, तर ते जाहीरपणे मांडण्याऐवजी तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीत व वरिष्ठांसमोर चर्चा करून सोडवले पाहिजेत असे कदम यांनी सांगितले. तसेच महायुतीमधील सर्व घटक पक्ष आपापल्या परीने पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करत असून यात कोणतीही दुजाभावाची भावना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
