भाईंदर :– मिरा भाईंदर शहरात प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात रविवारी पाच हजार महिलांच्या भव्य कलश यात्रेने झाली. यात्रेमुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
हा कार्यक्रम २ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत भाईंदर पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे मैदानावर होणार आहे. सायंकाळी चार वाजता दररोज कथावाचनास प्रारंभ होणार असून कार्यक्रमाचे आयोजन विश्व शांती सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.कथा सुरू होण्यापूर्वी सकाळी ठाकूर महाराज यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी कलश यात्रा काढली. शहरातील विविध भागातून या यात्रेत मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले.
शालेय पाठ्यपुस्तकात रामायन -गीता समाविष्ट करण्याची मागणी
कथा प्रसंगी बोलताना देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी भारतातील नागरिकांना गीता आणि रामायणाचे ज्ञान पुरेशा प्रमाणात मिळत नाही, असे सांगितले. त्यामुळे या ग्रंथांचा समावेश शालेय तसेच खासगी पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे जागरूक आणि नैतिक समाजनिर्मितीस हातभार लागेल, असे ठाकूर यांनी मत व्यक्त केले.
श्रेयासाठी राजकीय शर्यत
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या धार्मिक कार्यक्रमाचे राजकीय श्रेय घेण्यासाठी शहरात वाद पेटला आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरात फलकांवर भाजप नेते नरेंद्र मेहता आणि शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांच्या छायाचित्रांसह झळकले आहेत.दरम्यान “हा धार्मिक कार्यक्रम असून आम्ही केवळ सेवा भावनेतून सहभागी आहोत” असे शिवसेना नेते शंकर झा यांनी सांगितले आहे. तर “अशा धार्मिक उपक्रमांत राजकारण न आणता आम्ही श्रद्धेने सहभागी होत आहोत” असा दावा भाजप नेते गजेंद्र भंडारी यांनी केला आहे.
