वसई:- शुक्रवारी रात्री नालासोपाऱ्यात शुभम मिश्रा (३१) या तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी सहा आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे.शुभम मिश्रा (३१) हा नालासोपारा पूर्वेच्या गाला नगर परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा काही तरुणांच्या सोबत वादविवाद झाला होता.
शुक्रवारी रात्री शुभम मिश्रा व त्याचे मित्र एका हॉटेल मध्ये मद्यपान करण्यास बसले होते. यावेळी बोलणं सुरू असतानाच पूर्वीच्या जुन्या भांडणावरून वाद झाला होता.त्याच दिवशी रात्री ११.३० च्या सुमारास शुभम याला सिगारेट पिण्याच्या बहणाने नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान मंदिराच्या समोरच्या टपरी जवळ बोलावून शुभम यांच्या मांडीवर चाकूने वार केले. डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने ठेचून हत्या केली.
या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ६१(२) १८९(२), १८९(४), १९१(१), १९१(३), ३५२, ३५१(३) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), ३७(३) सह शस्र अधिनियम १९५९ चे कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी रविवारी सूरज अरविंद सिंग (कबाडे) (२६), प्रथम दिपक कारंडे (२२), सागर ममराज चव्हाण (२७), दिनेश राजन चंदेलीया (३०), अमित जितेंद्र झा (२१) या आरोपींना अटक केली.
तर सोमवारी या गुन्ह्यातील सहावा आरोपी रोशन सिंग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटक आरोपींना सोमवारी वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
