वसई: वसई विरार शहरात छुप्या मार्गाने वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मागील अडीच वर्षात ६ हजार ३१९ वीज चोरट्यांनी ५० कोटी ३९ लाखाची वीज चोरी झाल्याचे उघड झाले आहे. या वाढत्या वीज चोरीचा फटका वीज ग्राहक यांच्यासह महावितरणला बसत आहे.महावितरणच्या वसई मंडळातून वसई विरार यासह वाडा या विभागात सुमारे दहा लाखाहून अधिक वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.

मागील काही वर्षापासून शहराचे नागरीकरण वाढत आहे तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्र ही विस्तारत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची संख्या वाढत आहे. मात्र काही ठिकाणी अद्यापही छुप्या मार्गाने वीज चोरी करण्याचे प्रकार सुरूच आहेत.वीज मीटरच्या वाहिन्यांमध्ये फेरफार करणे, आकडे टाकणे,  मुख्य वीज जोडणीच्या सर्व्हिस वाहिनीला टॅपिंग करणे अशा विविध प्रकारच्या, रिमोट कंट्रोल अशा विविध क्लुप्त्या लढवून वीज चोरी होते. विशेषतः शहरात वाढणाऱ्या अनधिकृत चाळी अशा भागातही वीज चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे.याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह महावितरणला बसून लागला आहे. या वीज चोरीमुळे महावितरणचा आर्थिक तोटा होऊ लागला आहे.वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून भरारी पथके, विशेष मोहिमा हाती घेऊन कारवाया केल्या जात आहेत.मागील अडीच वर्षात एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२४ या दरम्यान ६ हजार ३१९ ठिकाणी वीज चोरांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.  या वीज चोरट्यांनी महावितरणची ५० कोटी ३९ लाख रुपयांची वीज चोरी केली होती. यातील सर्वाधिक वीज चोर हे नालासोपारा पूर्वेच्या भागातील १४७७ व वसई पूर्वेच्या भागातील १२९१ या भागातील आहेत.

हेही वाचा >>>वसई: लिफ्ट मध्ये चिमुकलीचा विनयभंग, कचरावेचकाला अटक

त्यांच्यावर वीज कायदा कलम १३५ नुसार कारवाई केली असल्याचे महावितरणने सांगितले आहे. वीज चोरीमुळे वीज तोटा अधिक प्रमाणात सहन करावा लागत आहे. वीज गळती होण्याच्या प्रकारात वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी सर्वाधिक कारवाया या वीज चोरांवर करून वीज गळती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>>मिरा भाईंदर शहरात आढळली ९ तीव्र कुपोषित बालके, संख्या १७ वर

विभाग निहाय वीज चोरी आकडेवारी

वसई विभाग

वीजचोर- २९७८

रक्कम- २५ कोटी ९७ लाख

विरार विभाग

वीजचोर- ३३४१

रक्कम- २४ कोटी ४३ लाख

संगनमताने वीज चोरी

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे प्रकार घडतात. मात्र प्रत्येक भागात वीज समस्या निवारण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांना याबाबत माहिती का मिळत नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. काही कर्मचारी यांच्या संगनमताने  वीज चोरीचे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर वीज जोडण्या देणारे कर्मचारी व वीज चोरीला सहकार्य करणारे कर्मचारी यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.