वसई:- वसई विरार शहरात होळी व धुळवडीच्या दिवशी एकापाठोपाठ एक घटना समोर येऊ लागल्या आहेत. मंगळवारी नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग मधील एका विहिरीत ६ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही मुलगी सोमवारी सकाळपासूनच बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. झोया खान (६) ही मुलगी नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग येथील गावदेवी अपार्टमेंट मध्ये रहात होती. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता तिची आई मुमताज ही कामासाठी बाहेर पडली.त्यानंतर तिची मुलगी खेळण्यासाठी बाहेर पडली. मात्र खेळत असतानाच अचानकपणे ती बेपत्ता झाली.
काही कालावधी उलटून गेल्यानंतर ती बेपत्ता असल्याचे तिच्या भावाला समजले. त्यानंतर तिची सर्वत्र शोध शोध सुरू झाली. मात्र शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबाने रात्री पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, मंगळवारी दुपारी तिचा शोध सुरू असताना नालासोपार पूर्वेच्या धानिव बाग येथील ओमनी कंपाऊंडमध्ये असलेल्या विहिरीत सहा वर्षीय झोयाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याच्या अहवालानंतर हत्या की अपघात ते स्पष्ट होईल असे विरार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी सांगितले आहे.या घडलेल्या घटनेमुळे आजूबाजूच्या शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी आमची तक्रार गांभिर्याने घेतली नाही त्यामुळे असा प्रसंग घडला असल्याचा आरोप झोया खान हिच्या कुटुंबाने केला आहे. आम्ही पोलिसांना झोयाला शोधण्याची विनंती केली तेव्हा पोलीस पार्टी करत होते, असा आरोप मयत झोयाची बहिण आयेशाने केला आहे.
