वसई: मिरा भाईंदरमध्ये मेट्रोला समांतर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या विचित्र रचनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. पण, एमएमआरडीएने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता संपूर्ण राज्यभरातून या प्रकल्पावर टीकेची झोड उठली आहे. विशेषतः विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही आपल्या एक्स (ट्विटर) खात्यावरून पुलाच्या रचनेबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मिरा-भाईंदर शहरात मेट्रोखाली तीन समांतर उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. यातील दोन पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. तर तिसरा दीपक हॉस्पिटल ते फाटक दरम्यानचा पूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, या पुलाच्या सुरुवातीला चार लेन आणि अखेरीस फक्त दोन होऊन पूल खाली उतरत असल्यामुळे समाजमाध्यमांवर याबाबत सडकून टीका करण्यात आली होती. पण, एमएमआरडीएने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमांवर सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या वेळेचे आणि मिरा भाईंदरच्या उड्डाणपुलाची छायाचित्र पोस्ट करत अशा प्रकारचे अपघात मिरा भाईंदर शहरात घडू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणल्या की, भाईंदरला बांधलेले नवीन पूल हा चुकीचा आहे आणि हे अपघातांना आमंत्रण आहे.
सप्टेंबर २०२२ ला, टाटा ग्रुप चे अध्यक्ष सायरस मिस्त्री हे कार अपघातात वारले. त्यांचा अपघात होण्याचे कारण एक दोषपूर्ण आणि त्रुटी असलेला उड्डाणपूल होता.
एमएमआरडीएने पुन्हा तसाच एक उड्डाणपूल बांधला आहे आणि ते त्यांची चूक कबूल सुद्धा करायला तयार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच अजून किती जीव धोक्यात घालणार आपण? हे डिज़ाइन चुकीचेच आहे. वाट्टेल ती सारवासारव करू नका, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या पक्षांकडूनही विविध प्रकारच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करून एमएमआरडीएवर निशाणा साधला आहे. एकीकडे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने हा उड्डाणपूल म्हणजे महायुतीची बनवाबनवी असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही या उड्डाणपुलाला जीवघेणा चमत्कार म्हंटले आहे.
तसेच शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनीही एमएमआरडीएचा मंत्री कोण आहे? असा सवाल उपस्थित करत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला आहे.

