scorecardresearch

नैसर्गिक नाल्यावर माती भराव?

वसई पश्चिमेच्या शंभर फुटी रस्त्यावरील एव्हरशाइन इस्टेटलगत सांडपाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाला आहे.

वसईत विकासकांचे बेकायदा उद्योग

वसई: वसई पश्चिमेच्या शंभर फुटी रस्त्यावरील एव्हरशाइन इस्टेटलगत सांडपाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाला आहे. सध्या येथे बेकायदा माती भराव करून नाला बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची स्थिती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वसई विरार शहर हे झपाटय़ाने विकसित होत आहे. विकासकांनी या विकासाचा अर्थ म्हणजे पाण्याच्या विविध प्रवाहांवर बेकायदा माती भराव करणे, अशा प्रकारे घेतला आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यावरच मातीचा भराव घातला जात आहे. यामुळे पाणी वाहून जाण्याच्या मार्गानाच अटकाव होत आहे. मागील काही वर्षांपासून अशाच प्रकारच्या कामांमुळे वसई-विरार शहर पाण्याखाली जाऊ लागले आहे.

 वसई पश्चिमेच्या एव्हरशाइन इस्टेटजवळ ( शंभर फुटी रस्ता) सांडपाणी वाहून नेणाऱ्या आणि अनेक वर्षे जुन्या असलेल्या नाल्याशेजारी माती भराव करण्याचे काम सुरू आहे. त्यातील काही मातीचा भराव नाल्यातही होऊ लागला आहे. या माती भरावामुळे हा नाला अरुंद झाला आहे. सुरुवातीला हा नाला २५ ते ३० फूट इतका रुंद होता तर त्याची खोलीसुद्धा जास्त होती. आता मात्र माती भरावामुळे नाला हळूहळू आक्रसून जात आहे. माती भराव करणाऱ्या विकासकाची जागा नाल्याला लागूनच असल्याने हा प्रकार होत असल्याचे दिसते.

या माती भरावासंदर्भातील माहिती आणि तक्रार वसई विरार महापालिकेच्या सहायक आयुक्तांकडे केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. महानगरपालिका सहायक आयुक्तांनी या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चव्हाण यांना दिली होती. याप्रकरणी कारवाई सुरू केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

एव्हरशाइन इस्टेटलगत सुरू असलेला माती भराव काही प्रमाणात नाल्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पालिकेने माणिकपूर पोलीस ठाण्यात पत्र दिले आहे. 

– गिल्सन घोन्सालवीस, सहायक आयुक्त प्रभाग ‘एच’

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Soil filling illegal industry of developers ysh

ताज्या बातम्या