वसई: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी पुकारलेल्या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता वसई-विरार भागातही उमटू लागले आहेत. सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वसईकर सरसावले असून रविवारी माणिकपूर नाका येथे मूक आंदोलन करीत वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला.
गेल्या २१ दिवसांपासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी नवी दिल्ली जंतर- मंतर येथे आंदोलन सुरू आहे.. देशातील ‘नीट’ सारख्या प्रमुख स्पर्धा परिक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यांविरोधात हे आंदोलन असून त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची व परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करीत अजूनही हे आंदोलन सुरू ठेवले आहे.
मात्र सरकारकडून अजूनही या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने दिवसेंदिवस आंदोलन अधिक प्रभावीपणे सुरू झाले आहे.सोनम वांगचूक यांनी छेडलेले हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याने त्याला वसई विरार मधील जनतेने ही पाठींबा दर्शवला आहे. रविवारी १९ जुलै सायंकाळी ‘जागृती सेवा संस्था, चुळणे’ तसेच नवघर-माणिकपूर परिसरातील जागरूक नागरिक, तरुण आणि विद्यार्थी वर्गाच्या वतीने माणिकपूर नाका येथे एक भव्य ‘मूक आंदोलन’ करण्यात आले.
तरुण आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
सायंकाळी ५ ते साडेसहा वाजेपर्यंत चाललेल्या या मूक आंदोलनात परिसरातील तरुण-तरुणी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात मागण्यांचे फलक घेऊन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलकांनी प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधून घेतले.तर सोमवारी सुध्दा वसई तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. bvc
