वसई: वसई विरार महापालिकेच्या माता बाल संगोपन केंद्रात सोनोग्राफी यंत्रणा बसविली आहे. मात्र कायमस्वरूपी सोनोग्राफी करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने ही यंत्रणा बंद अवस्थेत पडून आहे. वसई विरार शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सेवा दिली जात आहे. या आरोग्य सेवेसाठी सद्यस्थितीत शहरात पालिकेची २ माताबाल संगोपन केंद्र , ७ रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ आपला दवाखाना, ३५ आयुष्यमान आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत. त्याद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जाते. महापालिकेने गर्भवती महिला व अन्य रुग्ण यांच्या सोनोग्राफीसाठी यंत्रणा बसविली आहे.
नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील माता बाल संगोपन केंद्रात सोनोग्राफी यंत्रणा आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून ही यंत्रणा बंद असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. सुरुवातीला सोनोग्राफी करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध झाले होते. मात्र, ही यंत्रणा हातळण्यासाठी कायमस्वरूपी डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने सातत्याने यंत्रणा बंदच राहू लागल्या आहे. सोनोग्राफी यंत्रणा बंद असल्याने गर्भवती महिला यासह अन्य रुग्णांना खासगी सोनोग्राफी केंद्रात जावे लागत आहे.
तिथे अधिकचे पैसे मोजून सोनोग्राफी करवून घ्यावी लागत असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. सोनोग्राफी यंत्र तर दिले आहे मात्र ते सातत्याने बंदच असल्याची तक्रार नगरसेवक कन्हैया भोईर यांनी महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. त्यांनीही वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने ही सेवा सुरू राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना केली आहे.
महापालिकेकडून कायमस्वरूपी रेडिओलॉजिस्ट उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वैद्यकीय आरोग्य विभागाने सांगितले आहे. याबाबत लवकरच शहरातील खासगी सोनोग्राफी करणारे डॉक्टर यांची भेट घेऊन त्यांना आवाहन केले जाईल असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.

