scorecardresearch

पदपथांवर टपऱ्यांचा पसारा

वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या पदपथ व रस्ते या ठिकाणी टपऱ्यांचे अतिक्रमण झाले आहे. दिवसेंदिवस या टपऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने या टपऱ्या रस्ते व पदपथ गिळंकृत करू लागल्या आहेत.

वसई: वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या पदपथ व रस्ते या ठिकाणी टपऱ्यांचे अतिक्रमण झाले आहे. दिवसेंदिवस या टपऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने या टपऱ्या रस्ते व पदपथ गिळंकृत करू लागल्या आहेत.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर कब्जा करून टपरीवाले आपले बस्तान मांडून बसले आहेत. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वसई विरार महापालिका यासंदर्भात कोणतीही कारवाई करत नसल्याने टपऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.
वसई विरारमध्ये स्वयंरोजगारासाठी सफाई कामगार, अपंग आणि महिला बचत गट आणि गरजू नागरिकांना खाद्यपदार्थ आणि इतर व्यवसायासाठी पालिकेने टपऱ्या दिल्या होत्या. मंजुरी मिळालेल्या टपऱ्यांची संख्या केवळ २०० ते ३०० च्या दरम्यान होती. पण सध्या शहरात हजारोंच्या संख्येने टपऱ्या उभ्या दिसतात. या टपऱ्या रस्त्याच्या दुतर्फा लावल्या जात आहेत. अनेक ठिकाणी पदपथ या टपऱ्यांनी गिळंकृत केले आहेत. त्यात बेकायदेशीर पान टपऱ्यांवर सर्रासपणे अमली पदार्थ विकले जात आहेत. यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्याचप्रमाणे चायनीज आणि इतर खाद्यपदार्थाच्या टपऱ्यांवर भेसळीचे प्रकार चालतात, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
टपऱ्यांनी पदपथ आणि रस्ते व्यापल्यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होतो आहे. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते स्वत:च्या आर्थिक लाभासाठी या टपऱ्या लावत असल्याचा आरोप नागरिक करतात. वसई विरार महापालिका या टपऱ्यांवर भाडे पावतीनुसार कर वसुली करते, पण त्यांची नोंद अथवा अहवाल ठेवला जात नाही.
रस्ते रुंदीकरणाचा उपयोग शून्य
वाढते नागरीकरण व वाहनांची संख्या लक्षात घेता पालिकेने मागील काही वर्षांत शहरातील अरुंद रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. पण रुंदीकरण केलेले रस्ते या टपरीधारकांनी व्यापले आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Spread steps sidewalks self employment vasai virar encroachment swallowed the sidewalk amy

ताज्या बातम्या