वसई: एसटी महामंडळाकडून सवलत धारकांच्या सोयीसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) कार्डची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. वसई विरार शहरातही एनसीएमसी प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेली नोंदणी यशस्वी ठरल्यानंतर प्रत्येक आगारात नोंदणी सुरू झाली आहे. पण, १ मार्चपर्यंत नोंदणी न केल्यास एसटी महामंडळाकडून पुरवण्यात येणाऱ्या कोणत्याही सवलतीचा लाभ घेता येणार नाही, अशा आशयाच्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर याबाबत खुलासा करत जोपर्यंत ८० टक्के सवलतधारक प्रवाशांची नोंदणी पूर्ण होत नाही. तोवर कार्ड अनिवार्य केले जाणार नसल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

वसई, नालासोपारा आणि विरार येथील एसटी बस आगारातून शहरांतर्गत तसेच विविध जिल्ह्यांत बससेवा पुरवली जाते. पण अनेकदा सुट्टे पैसे नसणे, सवलतींसाठी लागू करण्यात आलेला पास सोबत नसणे, तसेच बोगस लाभार्थ्यांचा सुळसुळाट अशा विविध प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सवलत धारकांच्या सोयीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशांनुसार वसई, नालासोपारा, अर्नाळा या बस आगारात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) कार्डची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

पण, या कार्डाच्या माहितीसह काही वापरकर्त्यांकडून १ मार्च पर्यंत एनसीएमसी कार्डाची नोंदणी न केल्यास सवलती मिळणार नाहीत अशा स्वरूपाच्या अनेक पोस्ट व व्हिडिओ व्हायरल होत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. तर याबाबत खुलासा करत एसटी महामंडळाने हा दावा खरा नसल्याची पुष्टी केली आहे. जोपर्यंत ८० टक्के सवलत धारक नागरिक कार्डाची नोंदणी करत नाहीत तोवर ते अनिवार्य केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्या सवलतींसाठी कार्ड अनिवार्य?
एसटी महामंडळांतर्गत महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत, ६५ ते ७५ वयोगटातील प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत, ७५ वर्षांपेक्षा पुढील ज्येष्ठांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत विनाशुल्क प्रवास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के दरात मासिक पास योजना, बारावीपर्यंत मुलींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास, शाळा-महाविद्यालयांमध्ये थेट पास वितरण, स्वातंत्र्य सैनिक आणि एक साथीदार, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्यांना मोफत प्रवास, सामाजिक दुर्लभ घटकांमधील ३० टक्के सवलत, आवडेल तेथे कोठेही प्रवास, एसटी संगे तीर्थाटन योजना, आगाऊ आरक्षण अशा सुविधा दिल्या जात आहेत. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असणे आवश्यक असणार आहे.