scorecardresearch

राष्ट्रपुरुषांचे पुतळे ३० वर्षांपासून उपेक्षित; पुतळे बांधणारी समिती बरखास्तीनंतर वसई-विरार महापालिकेचेही दुर्लक्ष

वसईत एका सामाजिक संस्थेने बांधलेले राष्ट्रपुरुषांचे ६ पुतळे धूळखात पडले आहेत. ज्या संस्थेने पुतळे उभारले ती संस्था ३० वर्षांपूर्वीच बरखास्त झाल्यानंतर पुतळय़ाची देखभाल कुणी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुहास बिऱ्हाडे

वसई:  वसईत एका सामाजिक संस्थेने बांधलेले राष्ट्रपुरुषांचे ६ पुतळे धूळखात पडले आहेत. ज्या संस्थेने पुतळे उभारले ती संस्था ३० वर्षांपूर्वीच बरखास्त झाल्यानंतर पुतळय़ाची देखभाल कुणी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेनेही अद्याप हे पुतळे आपल्याकडे हस्तांतरित करून घेतलेले नाहीत. जयंती आणि पुण्यतिथीला या पुतळय़ांची स्थानिकांकडून तसेच राजकारण्यांकडून साफसफाई होते, एरम्वी हे पुतळे वर्षभर धूळखात पडलेले असतात. त्यामुळे राष्ट्रपुरुषांचा अनादर होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

वसई-विरार शहरात १९८५ मध्ये महाराणा प्रताप स्मारक समिती वसई तालुका स्थापना करम्ण्यात आली होती. विद्ममान आमदार मंगलप्रभात लोढा हे या समितीचे अध्यक्ष होते.  या समितीने शहरात एकूण ६ पुतळे बांधले होते. त्यापैकी शिवाजी महाराजांचे दोन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, महाराणा प्रताप आणि हेडगेवार यांच्या पुतळय़ांचा समावेश होता. आचोळे गावात असलेल्या  छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ाचे अनावरण भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते झाले होते. तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाचे अनावरण साध्वी ऋतंबरा यांच्या हस्ते करण्यात आले होते. सोपारा गावातील नाक्यावर असलेल्या राष्ट्रीय सेवक संघाचे संस्थापक केशव हेडगेवारांच्या पुतळय़ाचे अनावरण तत्कालीन आमदार संजीवनी रायकर यांच्या हस्ते झाले होते. हे पुतळे महाराणा प्रताप स्मारक समितीने बांधले असल्याने समितीमार्फतच या पुतळय़ाची देखभाल केली जात होती. १९९० मध्ये महाराणा प्रताप समिती बरखास्त झाली आणि पुतळे देखील वाऱ्यावर आले.  समिती नसल्याने या पुतळय़ांची देखभाल कुणी करत नाही.

समिती बरखास्त झाल्यानंतर हे पुतळे प्रशासनाने ताब्यात घ्यावे असे आम्ही सांगितले होते. वसई विरार महापालिकेकडेही आम्ही पाठपुरावा केला होता. मात्र अद्याप हे पुतळे महापालिकेने आपल्याकडे घेतले नाहीत, असे महाराणा प्रताप समितीचे माजी सचिव राजा जाधव यांनी सांगितले. पुतळय़ासाठी माझी खासगी जमीन मी दान केली आहे. परंतु आज पुतळय़ाची दुरवस्था बघून यातना होतात असे त्यांनी सांगितले.

दयनीय अवस्था

आचोळे गावात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या अर्धकृती पुतळय़ाला संरक्षक जाळी आहे. आचोळे गावातील स्थानिकांकडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाची निगा राखली जाते. मात्र सोपारा शाळेतील शिवाजी महाराजांचा पुतळा आणि केशव हेडगेवारांच्या पुतळय़ाची दुरवस्था झालेली आहे. शाळेत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावरील मेघडंबरी तुटलेली आहे. पण शाळेच्या आवारात असल्याने पुतळा किमान सुरक्षित तरी आहे. रा.स्व.संघाचे संस्थापक केशव हेडगेवारांच्या पुतळय़ाची दयनीय अवस्था झालेली आहे. हा पुतळा तर अडगळीत पडला असून त्याच्या आसपास कचरा पसरलेला आहे. पुतळय़ाची निगा कुणी राखत नसल्याने पुतळय़ावर धूळ माती साचली आहे. पुतळय़ाच्या आसपास वाहने उभी केली जात असल्याने हा पुतळा सहज दिसतही नाही. शहरात संघाचे आणि भाजपचे कार्यकर्ते असूनही त्यांचे देखील या पुतळय़ाकडे दुर्लक्ष झालेले आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Statues national heroes neglected vasai virar municipal corporation neglected dismissal committee constructing amy

ताज्या बातम्या