वसई: वसई-विरार महापालिकेने शहरातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला आहे. आरोग्यवर्धिनी अंतर्गत १२ नवीन आरोग्य केंद्र तयार करण्यात येत असून त्यातील चार आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत, तर उर्वरित आठ आरोग्य केंद्र प्रगतिपथावर आहेत. वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्या मानाने शहरात आरोग्य सुविधा उपलब्ध होणे ही गरजेचे बनले आहे. शासनाच्या नियमानुसार ५० हजार लोकसंख्येला १ आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे. सध्या स्थितीत पालिकेची असलेली आरोग्य केंद्र अपुरी आहेत. यासाठी आता शासनाच्या आरोग्यवर्धिनी अंतर्गत शहरात १२ नवीन आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी शासनाकडून ७ कोटी ४४ लाख इतका निधी मिळाला आहे.
या आरोग्य केंद्रामध्ये वैतरणा, फुलपाडा, उमराळे, माणिकपूर ही चार आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर कोपरी, डोंगरपाडा, परेरानगर नायगाव ही केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तसेच कामण, निळेगाव, समाजमंदिर पापडी, समाजमंदिर आगाशी, कारगिलनगर या केंद्रांची कामे ही प्रगतिपथावर आहेत. टप्प्याटप्प्याने आरोग्य केंद्राचे काम पूर्ण करून ती सुरू करण्याचे काम सुरू आहे. या आरोग्य केंद्रातून बाह्य रुग्ण विभाग सेवा, दीर्घकालीन संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगाची तपासणी व प्रतिबंध उपाययोजना, एच.बी. (हिमोग्लोबिन), मलेरिया चाचणी (बी.एस. एम.पी.) युरिन प्रेगनन्सी रॅपिड टेस्ट, मधुमेह तपासणी, डेंग्यू चाचणी, लसीकरण अशा सुविधा शहरातील नागरिकांना मिळणार आहेत.
शहरात आरोग्यवर्धिनी अंतर्गत १२ आरोग्य केंद्र तयार होत आहेत. त्यातील काही केंद्रे सुरू केली आहेत. जी काही बाकी आहेत तीसुद्धा लवकरच सुरू केली जातील. या केंद्राचा नागरिकांना चांगला लाभ मिळू शकेल.
– डॉ. विजयकुमार द्वासे, उपायुक्त वैद्यकीय आरोग्य विभाग महापालिका.