scorecardresearch

पीडित महिलांना भक्कम आधार, मदतीसाठी फौज

महिलांच्या तक्रारीवर केवळ गुन्हे न नोंदविता त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात भरोसा कक्षा (सेल)ची स्थापना करण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात भरोसा कक्षाची स्थापना

वसई : महिलांच्या तक्रारीवर केवळ गुन्हे न नोंदविता त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात भरोसा कक्षा (सेल)ची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात महिला पोलीस अधिकाऱ्यांबरोबर समुदपेशक, मानसोपचारतज्ज्ञ, वकील, डॉक्टर यांचा समावेश आहे. पीडित महिलांच्या पाठीशी एक भक्कम फौज उभी राहाणार असून महिलांना न्याय मिळेपर्यंत त्यांना मदत दिली जाणार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी या कक्षाची पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते औपचारिक सुरुवात करण्यात आली.महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून महिलांच्या सर्वाधिक तक्रारी या कौटुंबिक हिंसाचाराच्या असतात.

महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हे दाखल होतात, परंतु त्यामुळे न्याय मिळेलच याची शाश्वती नसते. पुढे लढा कसा द्यायचा, असा प्रश्न उभा राहातो. या काळात पीडित महिला मानसिकदृष्टय़ा पूर्णपणे खचून जाते. त्यामुळे अशा महिलांना मदत करण्यासाठी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून भरोसा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांविषयक गुन्हे कौटुंबिक असतील तर समुदपेशन केले जाणार आहे. जी प्रकरणे सामोपचाराने सोडविणे शक्य असतील ती सोडविण्यात येतील. पीडित महिलेच्या पाठीशी भक्कम आधार (बॅकअप) उभा करणे हा यामागे उद्देष असल्याचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितले. या कक्षाच्या संकल्पनेबद्दल बोलताना पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले की, मला भेटायला येणाऱ्या १० पैकी ७ अभ्यागत महिला असतात आणि महिलांच्या सर्वाधिक तक्रारी या कौटुंबिक असतात. महिला कुटुंबात सुरक्षित नाही हे समाजातील विदारक वास्तव आहे. यासाठी महिलांना न्याय देण्यासाठी त्याना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी भरोसा कक्ष काम करणार आहे.

न्याय मिळेपर्यंत मदत

भरोसा कक्षात महिला पोलीस अधिकारी, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, वकील आणि समुदपेशक आदींचा समावेश आहे. महिलांविषयक तक्रारी आल्यानंतर कक्षामार्फत महिलांना बोलावून त्यांचे समुपदेशन करम्ण्यात येणार आहे. पीडित महिलांना वैद्यकीय साहाय्यता आणि प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी विधिविषयक सेवा दिली जाणार आहे. महिलांना एकटे न सोडता त्यांना राहाण्याची सोय नसेल तर ती पुरविण्यात येणार आहे. पीडितेला न्याय मिळेपर्यंत तिची तक्रार बंद न करता शेवटपर्यंत सर्व मदत दिली जाणार आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Strong support victimized women army establishment trust cell police ysh

ताज्या बातम्या