वसई: वसई विरार महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय व महाविद्यालयीन सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला’ शनिवार पासून प्रारंभ झाला आहे. तीन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार असून यात महापालिका क्षेत्रातील ८६ फुटबॉल संघांनी सहभाग घेतला आहे.
वसई विरार महापालिका, क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय पालघर यांच्या तर्फे १ ते ५ ऑगस्ट या दरम्यान विरार पश्चिमेच्या म्हाडा (बोळींज) या मैदानावर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेचे १४ वे वर्ष असून यावर्षी महापालिका क्षेत्रातील एकूण ८६ फुटबॉल संघांनी नोंदणी केली असून १ हजार ३७६ ,खेळाडू यात सहभागी होणार आहे. १५ वर्षांखालील मुले, तसेच १७ वर्षांखालील मुले व मुली अशा एकूण ३ गटांत सामने रंगणार आहेत.
शनिवारी सकाळी या म्हाडा मैदानात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी वसई-विरार पालिकेचे महापौर अजीव पाटील, उप-महापौर मार्शल लोपीस, आयुक्त पृथ्वीराज बी.पी., विरोधी पक्षनेते मनोज पाटील, उपआयुक्त (क्रीडा) अजित मुठे, नगरसेवक-नगरसेविका, महापालिका अधिकारी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनाच्या सामन्यात आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी नाणेफेक केली, तर महापौर अजीव पाटील व आयुक्तांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी २० संघांमध्ये सामने पार पडले.
शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी मी तसेच सर्व नगरसेवक नेहमीच महानगरपालिकेच्या पाठीशी आहोत. या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अजूनही काही उणीवा, सूचना करावयाच्या असल्यास खेळाडूंना, शिक्षकांनी आम्हाला कळवाव्यात, त्या उणीवा सूचनांचा निश्चितच विचार केला जाईल. – अजीव पाटील, महापौर वसई विरार महापालिका
“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मैदानी खेळात नक्की सहभाग घेतला पाहिजे. या स्पर्धेचे वातावरण पाहून मला माझ्या महाविद्यालयीन काळातील खेळाची आठवण झाली.” :- पृथ्वीराज बी.पी. (आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका)
