पोलिसांच्या तपासाला यश

मीरा-भाईंदर आणि वसई-विरारच्या पोलिसांनी केलेला सखोल तपास आणि न्यायालयात सादर केलेल्या भक्कम पुराव्यांमुळे २०२१ या वर्षांत ८४९ आरोपींना न्यायालयात शिक्षा झाली आहे.

भाईंदर, वसईतील गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ८२ टक्के

वसई : मीरा-भाईंदर आणि वसई-विरारच्या पोलिसांनी केलेला सखोल तपास आणि न्यायालयात सादर केलेल्या भक्कम पुराव्यांमुळे २०२१ या वर्षांत ८४९ आरोपींना न्यायालयात शिक्षा झाली आहे. आरोपींना शिक्षा होण्याचे हे प्रमाण ८२ टक्के एवढे आहे. २०२१ या वर्षांत न्यायालयात १ हजार ३४१ खटल्यांची सुनावणी झाली, त्यापैकी ८४९ प्रकरणांतील आरोपींना शिक्षा झाली तर १८८ प्रकरणांतील आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटले. मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने न्यायालयात दोषारोपत्र सादर करताना भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर दिला. तपास करताना कसलेही कच्चे दुवे राहू नयेत यासाठी कसून सर्व प्रकारचे तांत्रिक, न्यायवैद्यक पुरावे गोळा केले आणि न्यायालयात सादर केले. त्याचा सकारात्मक परिणाम २०२१ या वर्षांत दिसून आला. १५ पोलीस ठाण्यांतर्गत  गुन्हे न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. 

आरोपींच्या शिक्षेसाठी विशेष शाखा

आरोपींवर गुन्हा दाखल केल्यानंतर ते न्यायालयातून सुटू नयेत यासाठी सदोष मनुष्यवध शाखा तयार करण्यात आली आहे. भारतातील ही एकमेव शाखा आहे.  शाखेअंतर्गत महत्त्वाच्या गुन्ह्यात पुरावे गोळा करण्यावर तपास अधिकाऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.   न्यायालयात आरोपी सुटू नये यासाठी काय करायला हवे, यासाठी पोलिसांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन केले जाते. कच्चे दुवे कोणते, कुठल्या त्रुटी राहतात याचा आधीच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला. खटला न्यायालयात उभा राहण्याच्या आधीदेखील त्यावर वरिष्ठांच्या वतीने अभ्यास करून न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

कसून तपास आणि भक्कम पुरावे यामुळे न्यायालयात आरोपींवर गुन्हे सिद्ध होऊन त्यांना शिक्षा होऊ शकली. हे प्रमाण अधिकाधिक वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या १८८ प्रकरणांतील आरोपी सुटले त्यांचा अभ्यास करून काय त्रुटी राहिल्या ते तपासले जाईल. प्रत्येक गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

– सदानंद दाते, पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई-विरार

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Success police investigation crime accused ysh

Next Story
मीरा-भाईंदरमध्ये ५०० चौरस फुटांखालील घरांना करसवलत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी