वसई:- विरारच्या अर्नाळा समुद्र किनारी बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तानसा खाडीत बुडून एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संजू तुकाराम गवते (३४) असे या मयत तरुणाचे नाव असून तो नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील रहिवासी होता. संजू हा हेदवडे येथे आपल्या मावशीकडे आला होता. शुक्रवारी सायंकाळी तो गावालगतच्या तानसा खाडीत आंघोळीसाठी उतरला. मुसळधार पावसामुळे खाडीला आलेल्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहत गेला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा करत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच तो पाण्यात दिसेनासा झाला. माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्य थांबवावे लागले. शनिवारी पहाटे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. ज्या ठिकाणी संजू बुडाला होता, त्याच परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. नदीकाठी त्याने काढून ठेवलेले कपडेही मिळून आले.
याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, गुरुवारी अर्नाळा समुद्रकिनारी ४ पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. त्यातील दोन जणांना जीवरक्षकांनी वाचवले होते, तर दोघांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांत तानसा खाडीत आणखी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याने अवघ्या दोन दिवसात तीन जणांचा बळी गेला आहे.पावसाळ्यात नद्या, खाड्या, समुद्रकिनारे आणि धबधब्यांवरील पाण्याचा वेग व खोलीचा अंदाज घेणे कठीण असते. त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना प्रवाहित पाण्यात उतरू नये, जीव धोक्यात घालू नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
