वसई: वसई पूर्वेतील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तानसा नदीवरील जुन्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. नदीला आलेल्या तीव्र पुराच्या प्रवाहात दुरुस्तीसाठी नदीपात्रात उभारण्यात आलेली बांबूची परांची वाहून गेल्याने कामात अडथळा निर्माण झाला आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. सुमारे ६४ ते ६५ वर्षांपूर्वी तानसा नदीवर पूल बांधण्यात आला होता. दीर्घकाळाच्या अहोरात्र वापरामुळे पुलाच्या खालच्या भागातील प्लास्टर मोठ्या प्रमाणात निखळले असून आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. काही गर्डरलाही तडे गेल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

​सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी नदीपात्रात बांबूची परांची उभारून काम सुरू करण्यात आले होते. मात्र मागील सहा दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला आलेल्या पुराच्या वेगवान प्रवाहात ही परांची वाहून गेली. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले काम थांबले असून आता कठड्याला बसविलेल्या लोखंडी अटकावाच्या साहाय्याने कामगारांना हवेत लटकून दुरुस्ती करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अधिक वेळखाऊ व किचकट असली तरी दुरुस्तीचे काम सुरूच राहणार असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले.

​दरम्यान, मुंबईकडील दोन गाळ्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. तसेच या जुन्या पुलाला समांतर दोन नवे पूल कार्यरत असल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असून, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत जुन्या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.