वसई : विरार पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर आज सकाळी शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक वाहनाला आग लागल्याची घडली. वाहनात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. यामुळे रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. पण, या गोंधळात घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी जळत्या वाहनातून शाळकरी विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

वसई विरारमध्ये बहुतांश शाळकरी विद्यार्थी शाळेच्या बसेस,रिक्षा तसेच टाटा मॅजिक यांसारख्या वाहनातून प्रवास करतात. आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी असेच एक टाटा मॅजिक वाहन विरार येथील चंदनसार रस्त्याकडून पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून चालले होते.पण, वाहन सुरू असताना अचानक चालत्या वाहनाला आग लागली. यामुळे पुलावरून चालणारे पादचारी आणि वाहनचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस हवालदार कैलास कोकाटे आणि पोलीस शिपाई सुभाष जाधव यांनी वेळेत धाव घेत तत्परतेने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे मोठा अपघात टळला.

यावेळी पोलिसांनी ७ ते ८ मुलांना या वाहनातून बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. तर वाहनाची तपासणी केली असता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि सतर्कतेचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

खाजगी वाहनातून शालेय विद्यार्थ्यांनी प्रवास टाळावा

विरारमध्ये घडलेल्या या घटनेत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना आज टळली आहे. पण, असे असले तरी खबरदारी म्हणून खाजगी वाहनांमधून शालेय विद्यार्थ्यांनी प्रवास करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वसई-विरार शहरातील बहुसंख्य विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी टाटा मॅजिकसारख्या खाजगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र, यापैकी अनेक वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, वाहनाची नियमित दुरुस्ती न करणे आणि क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणे या गंभीर त्रुटी वारंवार निदर्शनास येतात. अशा असुरक्षित वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बेकायदेशीर मॅजिक वाहनांवर होणार कारवाई?

वसई विरार शहरात बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या टाटा मॅजिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे स्थानिक रिक्षाचालकांचे नुकसान होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारी महापालिका सभागृहात पार पडलेल्या बैठकीत अशा बेकायदेशीर टाटा मॅजिक वाहनांवर कारवाई करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.