भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अतिरिक्त होताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी पटसंख्या वाढवण्याकरिता शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. म्हणूनच यंदा जूनऐवजी एक महिना आधीच प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मीरा-भाईंदर शहरात पालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू माध्यमाच्या एकूण ३६ शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ७ हजार २४८ इतकी आहे. मागील काही वर्षांत ती कमी होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून पालिका शाळेत इयत्ता नववीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शिवाय सेमी इंग्रजीमधील वर्ग घेत, शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवल्या जाणार आहेत.
पालिकेच्या शाळेतील काही वर्गामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच विद्यार्थी दाखल झालेले आहेत. त्यामुळे शाळेलगतच्या परिसरातील शाळाबाह्य मुलांचा शोध, त्यांची प्रवेश प्रक्रिया राबवणे, बालवाडी व अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी प्रयत्न करणे. आदी विद्यार्थी पटसंख्या वाढीसंदर्भातील कामे शिक्षकांना देण्यात आली आहेत. आगामी काळात विद्यार्थ्यांची पटसंख्या न वाढल्यास पालिका शाळेत अतिरिक्त शिक्षक संख्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदल्याही होऊ शकतात.
गेल्यावर्षी करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे खासगी शाळांचे शुल्क भरणे अनेक पालकांना परवडत नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना पालिका शाळांत दाखल केले. त्यावेळी विद्यार्थी संख्येत झालेली थोडी वाढ पाहता यंदा ही संख्या आणखी वाढण्याकरता प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा जूनऐवजी एक महिना आधीपासूनच म्हणजे १ मे पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली..