भाईंदर : खेळण्यातील एक किलोहून अधिक वजनाचे लहान चुंबकीय तुकडे गिळल्यामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या दहा वर्षीय मुलावर मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळेत उपचार मिळाल्यामुळे मुलाचा जीव वाचल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पोटदुखी आणि वारंवार उलट्या होत असल्याने मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला ही सामान्य पोटदुखी असल्याचा अंदाज होता.

मात्र तपासणीनंतर मुलाने खेळताना मोठ्या प्रमाणात लहान चुंबकीय धातूचे तुकडे गिळल्याचे स्पष्ट झाले. संबंधित मुलगा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर या आजाराने ग्रस्त असल्याने अन्न नसलेल्या वस्तू तोंडात टाकण्याची सवय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.बालरोगतज्ज्ञ डॉ. बादशाह खान यांनी तपासणीनंतर आतड्यात अडथळा निर्माण झाल्याचा संशय व्यक्त करून तातडीने एक्स-रे व सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. तपासणीत लहान आतड्यात अनेक चुंबक अडकून पडल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर डॉ. बिनल शाह यांनी कोलोनोस्कोपी केली. मात्र चुंबक मोठ्या आतड्यात पोहोचले नसल्याचे स्पष्ट झाले.यानंतर शल्यचिकित्सक डॉ. भावेश दोशी आणि डॉ. प्रदीप शेनॉय यांनी तातडीची शस्त्रक्रिया करून लहान आतड्यात अडकलेले सर्व चुंबक सुरक्षितपणे बाहेर काढले. योग्य वेळी उपचार झाल्यामुळे आतड्याला छिद्र पडणे आणि गंभीर संसर्गाचा धोका टळला. शस्त्रक्रियेनंतर मुलाची प्रकृती स्थिर असून आठवडाभराच्या उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

डॉ. बादशाह खान यांनी सांगितले की, एकापेक्षा जास्त चुंबक गिळल्यास ते आतड्याच्या वेगवेगळ्या भागांना एकमेकांना चिकटू शकतात. त्यामुळे रक्तपुरवठा बंद होऊन आतड्याला छिद्र पडण्याचा धोका निर्माण होतो. विशेषतः ऑटिझम असलेल्या मुलांच्या पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.