वसई : सोमवारी नालासोपारा येथील मशिदीच्या ट्रस्टच्या वादातून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिक मुस्सवीर मोहम्मद डायर ऊर्फ मुच्छु यांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सोपारा गावात तणाव पसरला होता. याप्रकरम्णी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे.
नालासोपारा येथील टाकीपाडय़ात असलेल्या सुन्नी गौसिया मशीद ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी रात्री आठच्या सुमारास रौफ अब्दुला शेख, बांधकाम व्यावसायिक मुस्सवीर मोहम्मद डायर ऊर्फ मुच्छु हे दोन सहकाऱ्यांसह या मशिदीत नमाज पडण्यासाठी गेले होते. बाहेर आल्यावर त्यांचा मोहम्मद इम्तियाज इस्माईल खान (३६), इम्रान युसूफ शेख (३३), अबरार खान (३८), अतारु खान (२८), इर्शाद खान ऊर्फ बंटी (४०) यांच्याशी वाद झाला. तुम्ही या मशिदीत यायचे नाही अशी दमदाटी यावेळी खान बंधूनी केली होती. त्यावर डायर यांनी जाब विचारल्यावर संतप्त इरशाद खानने चॉपरने मुस्सवीर मोहम्मद डायर ऊर्फ मुच्छु यांच्यावर वार केला होता. या हल्ल्यात डायर जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सुरू असल्याचे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले.