भाईंदर : ठाणे-घोडबंदर मार्गावरील घाट परिसरात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अखेर प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. रस्त्यावरील दुभाजकाचा काही भाग हटवून पाण्याला वाहून जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर या ठिकाणी पाणी लवकर ओसरू लागले असून वाहतुकीलाही काही प्रमाणात गती मिळत आहे.
गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे ठाणे-घोडबंदर घाट मार्गावरील करपे कंपाउंड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. परिसरातील डोंगराळ भागातून वाहून येणारे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने अनेक वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्या. परिणामी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कोंडीची तीव्रता वाढल्यानंतर मिरा-भाईंदर महापालिकेने घटनास्थळी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
संजय गांधी राष्टीय उद्यानाच्या डोंगराळ भागातून येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत निचऱ्याचा मार्ग अपुरा असल्याने पाणी रस्त्यावर साचत असल्याचे पाहणीत आढळून आले होते. त्यानंतर रस्त्यालगतचे पाण्याचे निचरा मार्ग खुले करण्यात आले. तसेच रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाचा काही भाग हटवून पाण्याला दुसऱ्या बाजूला वाहून जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर या परिसरातील पाणी लवकर कमी होत असून वाहतुकीची स्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मात्र खड्ड्यांचा प्रश्न कायम
घोडबंदर घाट मार्गावर अनेक दिवस पाणी साचत असल्याने डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. मात्र पाऊस सुरू असताना डांबरीकरण अथवा खड्डे बुजविण्याचे काम करणे शक्य नसल्याने पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.
पाण्याचा उगम शोधण्यासाठी पाहणी
करपे कंपाउंड परिसरात गेल्या वर्षापासून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नैसर्गिक जलप्रवाहात कुठेतरी अडथळा निर्माण झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह या दिशेने वळत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत नेमके कारण शोधण्यासाठी महापालिकेचे पथक लवकरच परिसरातील डोंगराळ भागाची प्रत्यक्ष पाहणी करून जलप्रवाहाचा अभ्यास करणार आहे.
