भाईंदर : ठाणे-घोडबंदर मार्गावर असलेली जुनी व धोकादायक झाडे कोसळून रस्त्यावर पडू लागली आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तर दुसरीकडे वाहनचालकांच्या जीवाला धोका वाढू लागला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ठाणे-घोडबंदर मार्ग जातो. राज्यातील अत्यंत वर्दळीच्या मार्गांपैकी हा एक मार्ग असून, साधारण दहा हजारांहून अधिक वाहने दररोज येथून प्रवास करतात. त्यामुळे या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर शासनाने आजवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र,अद्याप यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
दरम्यान, खड्डे आणि वाहतूक कोंडी अशा प्रमुख समस्या या मार्गावर जाणवत असताना, आता येथील घाट मार्गांवर रस्त्याच्या कडेला असलेली झाडे कोसळण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कामांमुळे नैसर्गिक समतोल बिघडल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी वारंवार केली होती. त्यात आता रस्त्यालगतची झाडे कोसळू लागल्याचे समोर आले आहे.
या मार्गावर अनेक जुनी झाडे असून ती सध्या धोकादायक अवस्थेत आली आहेत. तसेच, येथे डोंगर उतार असल्यामुळे पडलेली झाडे थेट रस्त्यावर येऊ लागली आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तर मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत असलेल्या या मार्गावरील झाडांचे उद्यान विभागामार्फत सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पडलेली झाडे हटवण्यासही दिरंगाई :
घोडबंदर मार्ग अरुंद असल्यामुळे येथील वाहतुकीवर मोठा ताण असतो. अशा वेळी रस्त्याच्या कडेला झाड कोसळल्यास रस्ता आणखी अरुंद होतो. अशा पडलेल्या झाडांची तात्काळ विल्हेवाट लावणे प्रशासनाकडून अपेक्षित असते. मात्र, संबंधित यंत्रणा वेळेवर पोहोचत नसल्यामुळे वाहतूक कोंडीची नवी समस्या निर्माण होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
