भाईंदर : ठाणे-घोडबंदर मार्गावर रस्ता ओलांडत असताना हरणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ठाणे-घोडबंदर मार्ग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असल्याने या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच असतो. विशेषतः बिबटे, हरणे, माकडे आणि इतर वन्यजीव पाणी व अन्नाच्या शोधात रस्ता ओलांडून उल्हास नदीच्या दिशेने जात असल्याचे अनेकदा दिसून येते.सोमवारी मध्यरात्री एक हरण रस्ता ओलांडत असताना भरधाव अवजड वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. धडकेनंतर हरण काही अंतरावर जाऊन पडले आणि गंभीर जखमी अवस्थेत तडफडत असल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिसले. काही वाहनचालकांनी वाहने थांबवून हरणाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर दुखापतीमुळे काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वीही या मार्गावर बिबट्या, माकडे तसेच इतर वन्य प्राण्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.वन्यजीवांना सुरक्षितपणे मार्ग ओलांडता यावा यासाठी ‘वाइल्डलाइफ कॉरिडॉर’, अंडरपास किंवा अन्य सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून सातत्याने केली जात आहे. मात्र त्याकडे प्रशासनाकडून अद्याप पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याची खंत व्यक्त होत आहे.