भाईंदर : ठाणे-घोडबंदर मार्गावरील घाट परिसरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रिक्षा दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फाउंटन हॉटेलजवळ घडली.ठाणे-घोडबंदर मार्गावर मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. निधीच्या कमतरतेमुळे या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम रखडल्याची बाब समोर आली असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे.

बुधवारी रात्री फाउंटन हॉटेल येथून ठाण्याकडे जाणारी रिक्षा घाट मार्गातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात नियंत्रणाबाहेर जाऊन दरीत कोसळली. अपघातावेळी चालकाने प्रसंगावधान राखत रिक्षेतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. मात्र प्रवासी रिक्षेसह दरीत कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गुरुवारी सकाळी पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने दरीत कोसळलेली रिक्षा बाहेर काढली. तसेच रस्त्यालगत वाहून गेलेल्या मातीचा भराव टाकून काही खड्डे तात्पुरते बुजविण्यात आले. या प्रकरणाची संबंधित पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.घोडबंदर मार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची भीती वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.