भाईंदर : ठाणे-घोडबंदर मार्गाच्या दुरुस्तीच्या निधीवरून वाद सुरू असतानाच मिरा-भाईंदर महापालिकेने मागील वर्षीच्या दुरुस्तीच्या कामासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारालाच दोषी धरत दोषदायित्व (डिफेक्ट लायबिलिटी) कालावधीअंतर्गत रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.
ठाणे घोडबंदर मार्गांवरील गायमुख ते फाउंटन हॉटेलदरम्यानचा सुमारे साडेचार किलोमीटर लांबीचा ठाणे-घोडबंदर मार्ग मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे या मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे आली. राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा मार्ग असून अवजड वाहनांच्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे रस्त्याची झीज होते. पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडत असल्याने दरवर्षी दुरुस्तीची आवश्यकता भासते.
यंदा मात्र या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेचा निधी खर्च करण्यास सत्ताधारी भाजपने विरोध केला. निधीअभावी या रस्त्याची दुरुस्ती राज्य शासनानेच करावी तसेच हा मार्ग पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा, असा ठराव महापौरांनी मंजूर करून प्रशासनाला निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, प्रवाशांच्या वाढत्या तक्रारीनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन महापालिकेला तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. मात्र, निधी खर्चाबाबतची भूमिका कायम असल्याने प्रशासन अडचणीत सापडले होते.
दरम्यान, मागील वर्षी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने सुमारे आठ कोटी रुपये खर्च केले होते. निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटदारामार्फत हे काम करण्यात आले होते. मात्र अवघ्या वर्षभरातच रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाल्याने आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी संबंधित कंत्राटदारावर बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. दोषदायित्व कालावधीअंतर्गत कंत्राटदाराकडूनच रस्त्याची दुरुस्ती करून घेतली जात असल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.
उर्वरित मार्गासाठी निधीची मागणी
ठाणे-घोडबंदर मार्गावरील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून केवळ दोषदायित्व कालावधीत येणारा भाग दुरुस्त करून प्रश्न सुटणार नाही. उर्वरित मार्गाच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता असून त्यासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे
महापौरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ठाणे घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश शासनाने मिरा भाईंदर महापालिकेला दिले आहे.मात्र तरी देखील सदर काम करण्यास मिरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने नकार दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास हानी पोहचणारे काम अटकाव निर्माण केल्या प्रकरणी महापौर डिंपल मेहता यांच्यावर पुढील ४८ तासात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख राजू भोईर यांनी केली आहे.
