भाईंदर :- ठाणे-घोडबंदर मार्गावरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी मिरा-भाईंदर महापालिकेकडे असली, तरी वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने काम रखडल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात अपघातांचा धोका अधिक वाढला आहे.
ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख ते वर्सोवा चौक (फाउंटन हॉटेल) दरम्यानचा सुमारे साडेचार किलोमीटर लांबीचा रस्ता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पालिकेवर आहे.गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाने रस्त्याची पाहणी केली. पाहणीत रस्ता अनेक ठिकाणी खचल्याचे व असमतल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खड्डे बुजवून रस्ता समतल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कामासाठी वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे. मात्र अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकलेले नाही, असा दावा पालिकेने केला आहे.ठाणे-घोडबंदर मार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असून या मार्गावरून दररोज लाखो वाहने प्रवास करतात. त्यामध्ये मालवाहू वाहने, बस, रिक्षा, कार तसेच मोठ्या संख्येने दुचाकींचा समावेश आहे. पावसामुळे खड्ड्यांची तीव्रता वाढत असल्याने या मार्गावर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मार्ग पाण्याखाली
गेल्या वर्षभरापासून गायमुख परिसरातील करपे कंपाउंडजवळ ठाणे-घोडबंदर मार्गावर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस नसतानाही या ठिकाणी अचानक पाणी साचत असल्याने वाहतुकीवर परिणाम होतो. हे पाणी नेमके कोणत्या कारणामुळे रस्त्यावर येते, याचे कारण अद्याप प्रशासनाला समजू शकलेले नाही. पालिका आणि वाहतूक प्रशासन या समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेत असून, तोपर्यंत या भागात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
परवानगी दिल्याचा दावा!
ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक अत्यंत वर्दळीची असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी रस्ता किंवा मार्गिका बंद करणे सोपे नाही. रस्ता बंद केल्यास लाखो वाहनचालकांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे योग्य नियोजन करूनच कामाला परवानगी देण्यात येते. त्यावरून नुकतीच या कामास मंजूरी दिली असल्याचा दावा काशिमिरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी दिली आहे.
“ठाणे-घोडबंदर मार्गावर काही ठिकाणी खड्डे बुजवून रस्ता समतल करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली असून, परवानगी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरू करण्यात येईल.”दीपक खांबित -शहर अभियंता ( मिरा-भाईंदर महानगरपालिका)
