भाईंदर : ठाणे-घोडबंदर मार्गावरील जीवघेणे खड्डे तातडीने न बुजवल्यास मिरा-भाईंदरच्या महापौर आणि महापालिका आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे मिरा-भाईंदर जिल्हाप्रमुख राजू भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

ठाणे-घोडबंदर मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून सर्वसामान्य नागरिक, रुग्ण, महिला आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.महापौरांनी या रस्त्याची दुरुस्ती महापालिकेमार्फत करू नये, अशा सूचना दिल्याचा उल्लेख करत भोईर यांनी या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजीपणाला जबाबदार धरत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पोलीस प्रशासनाने आणि वाहतूक शाखेने खड्डे बुजविण्याबाबत महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरीही महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.भोईर यांनी पोलीस प्रशासनाला ४८ तासांचा इशारा देत फाउंटन ते गायमुख या मार्गावरील तसेच शहरातील सर्व जीवघेणे खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे. या मुदतीत काम पूर्ण झाले नाही आणि खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी झाली, तर महापौर आणि महापालिका आयुक्तांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.