भाईंदर : ठाणे-घोडबंदर मार्गावरील खड्डे भरण्यावरून सुरू असलेला वाद कायम असल्याने अखेर वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत या मार्गावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ठाणे-घोडबंदर मार्ग मिरा-भाईंदर महापालिकेच्या ताब्यात असून या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र निधीअभावी या मार्गावरील दुरुस्ती रखडली आहे. सत्ताधारी भाजपने निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे.
मात्र निधीचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.या मार्गावर जागोजागी मोठे आणि खोल खड्डे पडल्यामुळे वाहतूक संथ होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. यापूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र निधीच्या प्रश्नामुळे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकलेले नाही.
या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी मिरा-भाईंदर वाहतूक पोलिसांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला असलेली माती आणून खड्डे तात्पुरते बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच उंच-सखल झालेला रस्ताही शक्य तितका समतल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जोपर्यंत संबंधित यंत्रणेकडून कायमस्वरूपी दुरुस्ती केली जात नाही, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
भाजपवर नेटकऱ्यांची नाराजी
ठाणे-घोडबंदर मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती रखडल्याने समाजमाध्यमांवर सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठली आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला असून या विषयावर विविध उपरोधिक पोस्ट आणि मीम्सही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
