भाईंदर :ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील खड्डे आणि असमान झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महायुतीतील भाजप-शिवसेना यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे रखडल्याचे समोर आले आहे. परिणामी वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे.ठाणे-घोडबंदर हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरून दररोज सुमारे १६ लाख वाहने धावतात. त्यात अवजड वाहनांची संख्याही मोठी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात रस्ता खचणे आणि मोठे खड्डे पडण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी दरवर्षी या रस्त्याची दुरुस्ती करावी लागते.

या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी गायमुख ते फाउंटन हॉटेलदरम्यानचा साडे चार किलोमीटर पर्यंत मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील हा रस्ता असल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार शासन आदेशही जारी करण्यात आला असून सध्या या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे आहे.

मात्र, यावर्षी महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर या रस्त्यावरील दुरुस्तीचा आर्थिक बोजा पालिकेवर पडणार असल्याचे कारण देत हा ‘पांढरा हत्ती’ पुन्हा राज्य शासनाकडे वर्ग करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील राजकीय संघर्षाचा परिणाम रस्त्याच्या दुरुस्तीवर झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पावसामुळे पुन्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र, पालिकेकडे दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध नसल्याने काम सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी वाहतूक कोंडी वाढली असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गतवर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला सुमारे आठ कोटी रुपये खर्च करावे लागले होते. यंदा केवळ एक कोटी रुपयांमध्ये दुरुस्ती होऊ शकते, असा अंदाज असतानाही काम रखडले आहे.रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून, लवकरच यावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.

महापौरांचा आक्षेप :

महापौर डिंपल मेहता यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होईपर्यंत पालिका निधीतून ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. महासभेने यासंदर्भात मंजूर केलेल्या ठरावाचाही त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे. त्यामुळे प्रशासनानेही पुढील कार्यवाही थांबविल्याचे समजते.

महापालिकेची शासनाकडे धाव :

महापालिकेने मे महिन्यात राज्य शासनाकडे रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती. मात्र, दोन महिन्यांनंतरही निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीला प्रत्यक्षात कधी सुरुवात होणार, याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे.