भाईंदर :- निधीची कमतरता आणि इतर कारणे पुढे करून ठाणे घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीस नकार देणाऱ्या मिरा-भाईंदर महापालिकेला शासनाने फटकारले आहे. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घेण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ठाणे घोडबंदर मार्गावरील गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा साडेचार किलोमीटर लांबीचा रस्ता मागील वर्षी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी ठाणे-घोडबंदर हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने रस्त्याची झीज होते. तसेच पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडत असल्यामुळे दरवर्षी दुरुस्ती करावी लागते. मात्र, यावर्षी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या व दुरुस्तीच्या कामास मिरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विरोध केला आहे. या संदर्भात महापौरांनी निधीची कमतरता असल्यामुळे दुरुस्ती शासनानेच करावी, तसेच हा रस्ता पुन्हा शासनाकडे हस्तांतरित करण्याबाबत ठराव करून प्रशासनाला आदेश दिले आहेत.त्यामुळे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटल्यानंतरही या मार्गावरील खड्डे भरले गेले नसल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून तक्रारी वाढल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात याप्रकरणी विशेष बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव, मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीस नकार देणाऱ्या महापालिकेला सरनाईक यांनी फटकारले. शासनाच्या नियमानुसार महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रशासनाची असताना ती नाकारणे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच घोडबंदर मार्गालगत मोठ्या संख्येने रहिवासी राहत असून त्यांच्याकडून महापालिका करही वसूल केला जात असल्याने त्यांना मूलभूत सुविधा देणे ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

म्हणून रस्ता केला हस्तांतरित

ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक सुरळीत व गतिमान करण्यासाठी या मार्गाच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भविष्यात या मार्गावरून मेट्रोही धावणार आहे. त्यामुळे या कामांना गती मिळावी आणि हा रस्ता मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत असल्याने नियमानुसार आवश्यक प्रक्रिया महापालिकेकडून राबविण्यात यावी, यासाठी हा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.