वसई: ठाणे-घोडबंदर घाट मार्गावर पावसामुळे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम मीरा-भाईंदर महापालिकेकडून ११ आणि १२ जुलै दरम्यान हाती घेण्यात आले आहे. मात्र, या दुरुस्तीच्या कामाचा थेट फटका मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला बसला असून, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर वर्सोवा पूल ते चिंचोटी दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या भीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वसई पूर्वेच्या भागातून गेला आहे. त्यामुळे या महामार्गावर दररोज २४ तास वाहनांची मोठी वर्दळ असते.
सद्यस्थितीत या महामार्गाला लागूनच असलेल्या ठाणे-घोडबंदर घाट मार्गाची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. करपे कंपाउंडजवळील घाट मार्गावर विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शनिवार ११ जुलैसकाळी ९ वाजल्यापासून ते रविवार १२ जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
या कामादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाण्याकडून येणारी वाहतूक चेना गाव येथून विरुद्ध दिशेच्या मार्गावर वळवून फाउंटन हॉटेलच्या दिशेने सोडण्यात येत आहे. तसेच दोन्ही दिशेची वाहतूक १५-१५ मिनिटांच्या अंतराने आलटून-पालटून सोडली जात आहे.
या रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक बदलांमुळे वाहनांच्या रांगा थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. शनिवारी सकाळपासूनच वर्सोवा पूल ते चिंचोटी फाटा या दरम्यान महामार्गाला ‘पार्किंग लॉट’चे स्वरूप आले होते. एरवी काही मिनिटांत कापले जाणारे अंतर पार करण्यासाठी आणि फाउंटन हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना तब्बल अडीच ते तीन तास लागत असल्याची माहिती एका त्रस्त प्रवाशाने दिली. त्यातच काही बेशिस्त वाहनचालक विरुद्ध दिशेने (रॉन्ग साईड) वाहने घुसवत असल्याने वसईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवरील वाहतूकही विस्कळीत होऊ लागली आहे. या मार्गावर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू आहे.
वाहतूक कोंडीचा गावपाड्यांना फटका मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत ससूनवघर, ससूपाडा, मालजीपाडा, बोबदपाडा आणि बापाणे यांसारखे अनेक गावपाडे आहेत. येथील स्थानिक नागरिकांसाठी महामार्ग हाच दळणवळणाचा एकमेव मुख्य मार्ग आहे. मात्र, महामार्गावर झालेल्या या अभूतपूर्व कोंडीमुळे रुग्णवाहिका, शालेय बस आणि नोकरदारांना मोठा फटका बसला असून गावकऱ्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
