भाईंदर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातून वाहणारे पाणी ठाणे-घोडबंदर मार्गावर साचल्याने ठाण्याहून फाउंटन हॉटेलकडे जाणारा एक मार्ग अद्याप बंद असून वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. परिणामी सलग दुसऱ्या दिवशीही या मार्गावर तीव्र वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांना दीड ते दोन तास खोळंबा सहन करावा लागत आहे.

ठाणे-घोडबंदर मार्ग हा ठाणे, मिरा-भाईंदर, वसई-विरार तसेच गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा आहे. विशेषतः गायमुख घाट परिसरात रस्ता अरुंद असल्याने येथे नेहमीच वाहतूक संथ गतीने सुरू असते. बुधवारी झालेल्या पावसानंतर राष्ट्रीय उद्यानातील डोंगरावरून वाहणारे पाणी करपे कंपाउंड परिसरातून थेट रस्त्यावर आल्याने ठाण्याहून फाउंटन हॉटेलकडे जाणारा मार्ग जलमय झाला. त्यामुळे हा मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

मात्र सर्व वाहने एकाच मार्गावर आल्याने गायमुख घाटासह संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. गुरुवारी सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कामावर जाणारे चाकरमानी, बस, रिक्षा तसेच खासगी वाहनांतील प्रवाशांना या कोंडीत अडकून दीड ते दोन तासांचा अतिरिक्त प्रवास करावा लागला आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले असून कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा काशिमीरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी केला. दरम्यान, वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक काम नसल्यास पुढील दोन दिवस ठाणे-घोडबंदर मार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केले आहे.