भाईंदर : मुसळधार पावसाचा फटका ठाणे-घोडबंदर मार्गाला सलग दुसऱ्या दिवशीही बसला असून घाटमार्गावरील वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याने प्रवाशांना एक तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून मंगळवारी सकाळपासून घोडबंदर परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने करपे कंपाऊंड परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली असून काही वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने ती रस्त्यातच बंद पडली आहेत.

परिणामी संपूर्ण घाटमार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे.ठाण्याहून वर्सोवाच्या दिशेने जाणारी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.त्यामुळे वाहतुकीत आणखी अडथळे निर्माण होऊन कोंडीची तीव्रता वाढली आहे.सकाळच्या गर्दीच्या वेळेत दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

घटना स्थळी काशिमीरा वाहतूक शाखेचे दहा कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.बंद पडलेली वाहने बाजूला करण्यासह वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी रस्त्यावर पाणी साचल्याने आणि वाहनांची संख्या मोठी असल्याने कोंडी सोडविण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना एक तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळावा आणि अत्यावश्यक काम असल्यासच घोडबंदर मार्गाचा वापर करावा, असे आवाहन काशिमीरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी वाहनचालकांना केले आहे.