वसई: ठाणे आणि कळवा खाडीपात्रात साचलेला गाळ आणि वाढती अतिक्रमणे यामुळे वसईला पुराचा मोठा फटका बसत असल्याचा दावा करत, महापौरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेतली. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तातडीने कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ठाणे, पालघर आणि पुणे या जिल्ह्यातून उल्हास नदी वाहते. ही नदी १२२ किमीचा प्रवास करून कल्याणजवळून पुढे वसईच्या खाडीतून थेट अरबी समुद्राला जाऊन मिळते. कर्जतजवळील राजमाची परिसरात उगम पावणारी ही नदी वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु औद्योगिक वसाहती आणि विनाप्रक्रिया सोडले जाणारे सांडपाणी यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे. तर दुसरीकडे या नदीच्या ठाणे-कळवा खाडीपात्रात झालेले अतिक्रमण आणि गाळ यामुळे वसई विरार शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे.
यासंबंधी महापौर अजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच कोकण भवन येथे विभागीय आयुक्तांची भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी महापौर नारायण मानकर आणि स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांचाही समावेश होता. यावेळी महापौरांनी शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष प्रामुख्याने ठाणे, कळवा आणि वसई खाडीपात्राकडे वेधले. या खाडी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. परिणामी, अतिवृष्टीच्या काळात शहरातून वाहणारे पाणी खाडीत न शिरता लोकवस्तीत शिरते. हा गाळ उपसून पात्राची खोली वाढवल्यास पुराचा धोका निम्म्याने कमी होऊ शकतो, अशी मागणी केली.
तसेच कळवा खाडीपात्रालगत झालेली बेसुमार अनधिकृत अतिक्रमणे हा देखील पूर येण्यामागील एक महत्त्वाचा तांत्रिक अडथळा असल्याचे ही अतिक्रमणे प्राधान्याने हटवून नैसर्गिक जलप्रवाह मोकळे करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. विभागीय आयुक्तांनी या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक त्या प्रशासकीय हालचाली करून आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून या मागण्यांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
