वसई: ठाणे-कळवा खाडीत जमा झालेला गाळ आणि अतिक्रमण यामुळे वसई-विरार शहरात निर्माण होणारी पूरपरिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी महापौर अजीव पाटील यांनी दिलेल्या पत्राची दखल घेत ठाणे महानगरपालिकेकडून प्रशासकीय हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीला लागून ठाणे-कळवा आणि वसई खाडीपात्र आहे. मात्र गेल्या काही काळात खाडी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने तसेच कळवा खाडीपात्रालगत बेसुमार अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. यामुळे अतिवृष्टीच्या काळात शहरातून वाहणारे पाणी खाडीत न शिरता लोकवस्तीत शिरते आणि वसई विरारमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण होते.
त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापौर अजीव पाटील, माजी महापौर नारायण मानकर आणि स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांच्या शिष्टमंडळाने कोकण भवन येथे विभागीय आयुक्तांची भेट घेतली होती. यावेळी खाडीपात्रातील गाळ उपसून पात्राची खोली वाढवण्याची तसेच अतिक्रमणे हटवून नैसर्गिक जलप्रवाह मोकळे करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती.
तसेच यासंबंधीचे पत्र देखील महापौर अजीव पाटील यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना १० एप्रिल रोजी पाठवले होते. या पत्राची दखल घेत, कळवा खाडीचे पात्र अरुंद झाल्यामुळे वसई-नायगाव परिसरात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचा मुद्दा आयुक्तांनी गांभीर्याने घेतला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तांत्रिक बाबींच्या पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण आता ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त-२ यांच्याकडे वर्ग करण्यात आले असल्याचे ठाणे महानगरपालिकेचे उपआयुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी २० एप्रिल रोजी महापौरांना पत्राद्वारे कळवले आहे.
