Premium

२० वर्षांपूर्वीच्या सामूहिक हत्याकांडातील फरार आरोपीला अटक, जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना झाला होता फरार

वसईच्या खैरपाडा मध्ये २० वर्षांपूर्वी झालेल्या ४ जणांच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणातील फरार आरोपीला वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोल्हापूरच्या इचलकरंजी येथून अटक केली आहे.

arrest
२० वर्षांपूर्वीच्या सामूहिक हत्याकांडातील फरार आरोपीला अटक

वसई– वसईच्या खैरपाडा मध्ये २० वर्षांपूर्वी झालेल्या ४ जणांच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणातील फरार आरोपीला वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोल्हापूरच्या इचलकरंजी येथून अटक केली आहे. दिलीप तिवारी असे या आरोपीचे नाव असून तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना २०२१ मध्ये संचित रजेवरून फरार झाला होता. बहिणीने खालच्या जातीच्या मुलाशी लग्न केल्याच्या रागातून त्याने बहिणीच्या कुटुंबातील ४ जणांची गळे चिरून हत्या केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई पूर्वेच्या वालीव येथे खैरपाडा परिसर आहे. या परिसरात राहणार्‍या सुषमा तिवारी या तरुणीने याच परिसरातील प्रभू नोचील या तरुणाशी लग्न केलं होतं. प्रभू हा खालच्या जातीचा असल्याने सुषाचे कुटुंबिय संतप्त झाले होते. त्यामुळे १७ मे २००४ मध्ये सुषमाचा २४ वर्षीय भाऊ दिलीप तिवारी याने सुषमाचा पती प्रभू नोचील, सासरे कृष्णन नोचील, मावस भाऊ बिजीत आणि मित्र अभिराज पिपलदास या चौघांची गळे चिरून हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

हेही वाचा >>> पुणे : पंचतारांकित हॉटेलमध्ये साडेपाच लाखाची दारू पिऊन काढला पळ; अशी केली फसवणूक

तत्कालीन माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी दिलीप तिवारी आणि या हत्याकांडात मदत करणार्‍या त्याच्या दोन मित्रांना अटक केली होती. पालघर सत्र न्यायायय आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलीप तिवारी याला फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फाशीची शिक्षा रद्द करून त्याला २५ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून तो कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता.

हेही वाचा >>> पुणे : शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रकार समुपदेशनात उघड

२०२१ मध्ये पॅरोल मिळवून फरार..

करोना काळात दिलीप तिवारी याने ३० दिवसांच्या संचित रजेसाठी (पॅरोल) अर्ज केला. रजा मंजूर होताच तो फरार झाला. त्यानंतर तो गुन्हेगारी कारवायात सक्रीय होता. पुण्यातील एका खंडणी आणि शस्त्रास्त्र बाळगल्याच्या प्रकरणातही त्याला अटक झाली होता. दरम्यान वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्याचा माग काढून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ज्ञानेश्वर फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अतुल नवाले, मुकेश पवार, किरण म्हात्रे, मनोज मोरे, सचिन दोरकर, सचिन गांगुर्डे, विशाल निंबाळकर आदींच्या पथकाने या आरोपीला अटक केली.

कैलास बर्वे यांच्या अचूक तपासामुळे शिक्षा

२० वर्षांपूर्वी घटना घडली तेव्हा कैलास बर्वे हे माणिकपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी केलेला अचूक तपास आणि साक्षीपुरावे यामुळेच दिलीप तिवारी याला फाशीची शिक्षा झाली होती. विशेष म्हणजे फरार तिवारीला २० वर्षानंतर पुन्हा अटक करताना कैलास बर्वे हेच वालीव पोलीस ठाण्याचे प्रमुख आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The accused in the mass murder of 20 years ago was arrested ysh

First published on: 02-06-2023 at 17:32 IST
Next Story
भाईंदर :…जेव्हा नववधू लिफ्ट मध्ये अडकते