विरार : दरवर्षी पावसाळय़ात नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत असताना या वर्षी पालिकेने आपत्कालीन व्यवस्था आणि सखल भागांसाठी विशेष यंत्रणा राबविल्या आहेत. पण पहिल्याच पावसाने पालिकेच्या यंत्रणाची दांडी गुल केली आहे. अनेक सखल भागांत सकाळपासून पाणी साचायला सुरुवात झाली तर दुपापर्यंत अनेक गृहसंकुले आणि दुकाने पाण्याखाली गेली. यामुळे याहीवर्षी सखल भागांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे.
वसई-विरार महानगरपालिकेने या वर्षी नालेसफाई अगदी शेवटच्या आठवडय़ापर्यंत ओढाताण करून पूर्ण केली. पावसाने उशिरा आगमन केल्याने पालिकेला नालेसफाईला अधिक अवधी मिळाला. पण पालिका सांगत असली तरी अजूनही शहरातील अनेक भागातील नाले साफ झाले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक नागरीवस्तीतील छोटे नाले साफ झालेच नसल्याने पहिल्या पावसात अनेक चाळीत आणि गृहसंकुलात पाणी जमा झालेले पाहायला मिळाले आहे.

या वर्षी नागरिकांना पालिकेने आपली आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम केल्याचा दावा करत प्रत्येक प्रभागात स्वतंत्र आपत्कालीन केंद्र तयार केले आहे. सखल भागातील पाणी काढण्यासाठी ३५ नवे पंप खरेदी करण्यात आले. त्याचबरोबर, अग्निशमन, महावितरण आणि इतर यंत्रणा सुरू असल्याचा दावा केला आहे. यासाठी पालिकेने प्रसिद्धीप्रत्रक काढून प्रत्येक आपत्कालीन केंद्राचे क्रमांक सार्वजनिक केले होते. यात ९ प्रभागांची आपत्कालीन माहिती देण्यात आली होती. यामुळे यावर्षी नागरिकांना पुराचा सामना करावा लागणार नाही असे वाटले होते. पण पहिल्याच जोरदार पावसात पालिकेची आपत्कालीन यंत्रणा बंद असल्याचा अनुभव आला.

शुक्रवार सकाळपासून शहरात पावसाला चांगलीच सुरुवात झाली. मुसळधार पावसाने नालासोपारा पूर्वेकडील आचोळे, सेंट्रल पार्क, अलकापुरी, मजेठिया नगर, संख्येश्वर नगर, एकंर पार्क, एव्हरशाइन सदराचा परिसर पाण्याखाली गेला होता. तर विरार पश्चिमेला जुना विवा कॉलेज रोड, बोळिंज परिसर पाण्याखाली गेला. दुपापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने आचोळे आणि आसपासच्या सर्व गृहसंकुलांत पाणी शिरले होते. यात दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.नागरिकांना गुडघ्याभर पाण्यातून प्रवास करावा लागला.

पालिकेची आपत्कालीन यंत्रणेचे क्रमांक बंद
महापालिकेने या वर्षी एकच मध्यवर्ती आपत्कालीन केंद्र न तयार करता प्रभागनिहाय केंद्र तयार केले. ९ प्रभागांत ९ केंद्र पालिकेने स्थापन केले. यातील सर्व आपत्कालीन यंत्रणेचे क्रमांक बंद आहेत. यामुळे नागरिकांना याचा कोणताही फायदा होत नाही. पालिकेने हे क्रमांक सार्वजनिक करण्याआधी त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आपत्कालीन विभागाचे उपायुक्त शंकर खंदारे याच्याची संपर्क साधला असता त्यांनीसुद्धा फोन उचलला नाही. यामुळे पालिकेची आपत्कालीन यंत्रणा केवळ कागदावरच उभी असल्याचा अनुभव नागरिकांना पहिल्या मुसळधार पावसात आला आहे.