वसई: मागील काही वर्षांपासून शहरात बोगस डॉक्टर ही सक्रिय होऊ लागले आहेत. त्यामुळे हळूहळू त्यांचा सुळसुळाट वाढू लागला आहे. जानेवारी २०२० ते मार्च २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत सुमारे २८ बोगस डॉक्टरांची प्रकरणे महापालिकेच्या आरोग्य पथकाने उघड करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे.
विविध ठिकाणी वाढते अनधिकृत बांधकामे व बैठ्या चाळी अशा दाटीवाटीच्या भागाचा आसरा घेऊन बोगस डॉक्टर आपले दवाखाने थाटत आहेत. दवाखाना चालू करताना महापालिकेच्या आरोग्य विभागाची व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची परवनागी घेणे आवश्यक असते. तसेच त्यामध्ये योग्य प्रशिक्षण घेतलेला डॉक्टर, योग्य ती साधने असणे गरजेचे आहे. मात्र कोणत्याही प्रकारचे नोंदणी आणि परवानगीविना अशा प्रकारचे दवाखाने चालविले जात असल्याचे समोर येत.
हळूहळू शहरात विविध ठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढू लागला आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी आता वसई विरार महापालिकेच्या आरोग्य पथकाने मोहीम आखली आहे.
या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत.
जानेवारी २०२० ते मार्च २०२५ या दरम्यान शहरात २८ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत.यात सर्वाधिक बोगस डॉक्टर हे नालासोपारा पूर्वेच्या भागातून आढळून आले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे. बोगस डॉक्टर आढळून आले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दवाखाने बंद करण्यात आले आहेत. बोगस डॉक्टरांची शोध मोहीम ही सुरूच आहे असे महापालिकेने सांगितले आहे.
या भागात आढळले बोगस डॉक्टर
वसई वेस्ट १, विरार वाय के नगर १, नारंगी २ राजावळी २, धानिव बाग ७, बिलालपाडा १, सातिवली ३, हवाईपाडा १, पेल्हार वनोठापाडा १, बावशेतपाडा १, वाकणपाडा१, चिंचोटी १, वालीव १, संतोष भवन १, अलकापुरी १, मनीचा पाडा १, रिचर्ड कंपाउंड १, नवघर पूर्व १ , अशा भागात आढळून आले असून यात विशेषतः नालासोपाऱ्यात सर्वाधिक बोगस डॉक्टर आहेत त्यामुळे नालासोपारा हे बोगस डॉक्टरांचे केंद्र बनू लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नागरी आरोग्याचा प्रश्न
वसई विरार शहरात परराज्यातून मान्यता नसलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्या असलेले, कसलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेले ठकसेन डॉक्टर बनून धंदा करत आहेत. यामुळे रुग्णांवर चुकीचे उपचार होऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.सहायक कर्मचारी, म्हणून काम करणारे सुद्धा डॉक्टर बनून काहीवेळा रुग्णांवर उपचार करीत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांना आवर घालावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
बोगस डॉक्टरांची शोध मोहीम वैद्यकीय विभागाकडून सुरूच आहे. त्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. त्यांच्याद्वारे धाडी टाकून कारवाया केल्या जात आहेत.- डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी वसई विरार महापालिका
बोगस डॉक्टरची माहिती देण्याचे आवाहन
वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची शोध मोहीम सुरूच आहे. दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते असे पालिकेने सांगितले आहे. याशिवाय आपल्या परिसरात असे अवैध (बोगस)वैद्यकीय व्यवसायिक असल्याचे निदर्शनास आल्यास लगेचच जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती द्यावी असे आवाहनही नागरिकांना पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे.