|| प्रसेनजीत इंगळे

विरार :  मालमत्ता विभागाला प्रभाग समितीतीतून मालमत्तेची खोटी माहिती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एका प्रभागातील चक्क ३१ गाळे आणि मंडईतील ५० च्या जवळपास ओटे गायब केल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीत या प्रभागात पालिकेची कोणतीही मालमत्ता नसल्याची खोटी माहिती पालिका मुख्यालयाला पुरविण्यात आली आहे.

वसई विरार महानगरपालिका स्थापनेपासून स्वतंत्र मालमत्ता विभाग अजूनही अस्तित्वात नाही. यावर्षी पालिकेने हा प्रयत्न चालवला आहे. यासाठी पालिकेने फेब्रुवारी महिन्यात आपल्या क्षेत्रात असलेल्या पालिकेच्या मालमत्तेची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले. यात व्यावसायिक गाळे, भाडेतत्त्वावर दिलेल्या इमारती, मंडईतील ओटे तसेच पालिकेने उभारलेली मार्केट याची माहिती सर्व प्रभागनिहाय गोळा करायला सांगितली होती. त्यानुसार सर्व प्रभागाने ही माहिती पालिका मुख्यालयाला दिली. पण यातील प्रभाग ‘बी’मध्ये शून्य मालमत्ता असल्याची माहिती देण्यात

आली. मुळात प्रभाग समिती बी मध्ये मनवेल पाडा परिसरात पाम इमारतीच्या समोर रस्त्याच्या दुतर्फा नगर परिषदेने गाळे आणि ओटे बांधले आहेत. यातील एका बाजूला महिला उद्योग केंद्र बांधून यात ३१ गाळे आहेत. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कै. दामोदर पाटील मंडई बांधली आहे. यात ५० च्या जवळपास ओटे आहेत.  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क ही मालमत्ता अहवालातून गायब केली आहे. या संदर्भात माहिती घेतली जाईल. मुख्यालयाला दिलेली माहिती ही कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. यासंदर्भात सदर विभागाला विचारणा करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रभाग समिती बी च्या सहाय्यक आयुक्त धनश्री शिंदे यांनी दिली.

२९९ गाळेधारकांस पालिकेच्या नोटीसा

वसई विरार महानगरपालिका निर्माण होण्याआधी नगर परिषद त्याआधी ग्रामपंचायत या काळापासून पालिकेच्या मालमत्ता अस्तित्वात आहेत. यात अनेक मालमत्ता गैर पद्धतीने मालमत्ताधारकांनी विकल्यासुद्धा आहेत.  नाममात्र भाडेत्त्वावर नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी देण्यात आलेल्या या मालमत्तांचा कोणताही हिशेब पालिकेकडे नाही. यातील अनेक गाळ्यांचे करार संपूनही पालिकेकडून नवे करार करण्यात आले नाहीत. तसेच अनेक गाळेधारकांनी अनेक वर्षांपासून हे नाममात्र शुल्कसुद्धा भरले नाही. अशा २९९ गाळेधारकांस महपालिकेने कारवाईच्या नोटीसा बजावल्या होत्या. वसई विरार माहापालिकेतर्फे ९ प्रभागात ५२६ व्यावसायिक गाळे असल्याची माहिती दिली होती.